Ladki bahin yojna : मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी होणार की परकी या संभ्रमात

 


नव्या सरकारच्या नव्या निकषांची चर्चा 

२१०० येणार की १५०० देखील जातील याची भीती

मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभर चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची मदत दिली जाते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीच्या विजयासाठी लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या महायुती सरकारने पुन्हा सत्तेत आल्यानंतर योजनेसाठी ठरविण्यात आलेल्या नव्या निकषांबाबत अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी झालेल्या लाडक्या बहिणी आता परक्या होणार अस चित्र पहावयास मिळत आहे. 


अलीकडेच, राज्य सरकारने डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता २.४० कोटींहून अधिक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला आहे. मात्र  नव्याने लाभार्थी महिलांचे अर्ज तपासले जाणार आहेत. त्यामुळे १५०० नंतर आता २१०० रु. मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


दुसरीकडे अर्जांची छाननी कशी, कोण आणि कधी करणार आदी प्रश्नांनी लाभार्थी महिला संभ्रमात आहेत. अर्ज छाननीबाबत अद्याप कोणतीही सूचना प्राप्त झाली नसल्याचे जिल्हा महिला व बालविकास विभागाचे म्हणणे आहे.


महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या आठवड्यात घोषणा केली होती की सरकार बनावट लाभार्थींशी संबंधित तक्रारींचे निराकरण करेल आणि पडताळणीसाठी आयकर आणि परिवहन विभागांकडून माहिती मागवली आहे.  ते म्हणाले होते की सरकार तपासाचे आदेश देत नाही, तर केवळ स्थानिक सरकारी कार्यालयांमध्ये दाखल केलेल्या तक्रारींचे निराकरण करत आहे.


आदिती तटकरे म्हणाल्या की, लाभार्थी महिलांचे अर्ज तपासताना कौटुंबिक उत्पन्नासोबतच लग्नानंतर दुसऱ्या राज्यात स्थायिक झालेल्या आणि ज्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांची रक्कम सरकार वसूल करणार असल्याची अफवा पसरली आहे.  दुसरीकडे, चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतल्याबद्दल धुळ्यातील एका महिलेकडून पाच महिन्यांचा साडेसात हजार रुपयांचा हप्ता सरकारने परत घेतल्याचे चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळाले.  त्यामुळे लाडकी बहिण योजनेबाबत लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post