WTC : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतून भारत बाहेर


नवी दिल्ली : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ११ जूनपासून खेळवला जाणार आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे. दक्षिण आफ्रिकेने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत दाखल झाली आहे, तर ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीत भारताचा ६ गडी राखून पराभव करून आपले स्थान आधीच निश्चित केले होते.  मात्र ऑस्ट्रेलियाने या विजयाने अंतिम फेरी गाठण्याच्या भारतीय संघाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. 


२०१९ मध्ये झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा दारुण पराभव केला होता, तर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने पुन्हा अंतिम फेरीसाठी आपले स्थान पक्के केले असून यावेळी त्यांची लढत दक्षिण अफ्रिकेसोबत होणार आहे. दक्षिण अफ्रिका पहिल्यांदाच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. दक्षिण अफ्रिकेची ११ सामन्यांमध्ये ६६.६७ अशी विजयाची टक्केवारी आहे आणि त्यांनी ७ सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६३.७३ आहे आणि त्यांनी आतापर्यंत ११ सामने जिंकले आहेत. भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर असून त्यांच्या विजयाची टक्केवारी ५० टक्के आहे, तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आणि श्रीलंका पाचव्या स्थानावर आहे.


 श्रीलंका सध्या पाचव्या स्थानावर असला तरी भारतीय संघाने सिडनीमध्ये विजय मिळवला असता तर अंतिम फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा जिवंत राहिल्या असत्या. मात्र, भारताचा पराभव होताच श्रीलंकेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. श्रीलंकेने या चक्रात ११ सामने खेळले असून ५ सामने जिंकले आहेत. मायदेशात खेळल्या गेलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांनी ऑस्ट्रेलियाला २-० ने पराभूत केले असते, तर श्रीलंकेची विजयाची टक्केवारी भारत आणि ऑस्ट्रेलियापेक्षा चांगली असती आणि श्रीलंका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरी खेळू शकला असता.


जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सर्व स्पर्धेत इग्लंड संघाने सर्वाधिक २२ सामने खेळले आहेत त्यापैकी ११ सामन्यात त्यांना यश आले आहे तर १० सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. अशा परिस्थितीत त्यांची विजयाची टक्केवारी केवळ ४३.१८ इतकी होती. या चक्रात वेस्ट इंडिजने केवळ २ सामने जिंकले तर पाकिस्तान आणि बांगलादेशने प्रत्येकी ४ विजय नोंदवले. श्रीलंकेने ५ सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने (पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा निकाल वगळता) प्रत्येकी ७ सामने जिंकले आहेत. भारताने ९ सामने जिंकले तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने ११-११ सामने जिंकले. तथापि, विजयाच्या टक्केवारीच्या बाबतीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आघाडीवर राहिले, त्यामुळे ते जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील.

Post a Comment

Previous Post Next Post