खासदार अशोकराव चव्हाण व खासदार रवींद्र चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उदघाटन व लोकार्पण
नांदेड : लोकशाही सशक्त बनविण्यासाठी न्याय व्यवस्था आहे. न्याय व्यवस्थेत मुलभूत सुविधा प्राप्त करुन देणे आवश्यक आहे, यामुळे न्यायव्यवस्था अधिक कार्यक्षम होईल व यातून एक नवीन पर्व सुरु होईल. भोकर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या या नूतन विस्तारीत इमारतीमुळे सर्वाना पोषक वातावरण मिळून न्यायालयात येणाऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांनी व्यक्त केला.
भोकर येथे सुमारे १४ कोटी ५१ लाख ६५ हजार रुपये खर्च करून बांधलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन विस्तारीत न्यायालयीन इमारतीचा उद्घाटन सोहळा न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. भोकर येथील न्यायालयाची नूतन व जुनी इमारत तीन ठिकाणी जोडली असून सदर इमारत एकूण २७ हजार चौरस फुटाची आहे. तीन मजल्यावर ही इमारत उभी आहे. या इमारतीत बिजनेस सेंटर, फ्रंट ऑफिस, मीडिया सेंटर, रेकार्ड रुम, बार रुम, स्त्री व पुरुष विटनेस रुम, शासकीय अभियोक्ता कार्यालय, स्त्री व पुरुषासाठी स्टाफ रुम, कन्सुलेशन रुम इत्यादी केले आहे. तसेच पार्कीग, कोर्ट हॉल, जज चेंबर, ॲन्टी चेंबर, कोर्ट ऑफिससह प्रस्तावित करण्यात आले आहे.
कुठलीही वास्तू उभी राहण्यासाठी अनेक संर्घषाचा सामना करावा लागतो. अनेक कष्टकऱ्यांचे योगदान या इमारतीच्या बांधकामासाठी लाभले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून ही इमारती उभी राहीली असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.पी. ब्रम्हे यांनी केले. नवीन इमारतीसोबत इतर सोयी-सुविधाही हळूहळू सुरु करता होतील. विधीज्ञ व न्यायालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांनी तळागाळातील पक्षकार हा केंद्रबिंदु ठरवून कामकाज करावे. तसेच बदलत्या परिस्थितीत वकीलांनी अन्यायापासून वंचित असणाऱ्या लोकासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते यापूर्वी भोकर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. त्यांच्याच उपस्थितीत या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण होत आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच ही इमारत पूर्णत्वास गेली असल्याचे न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांनी सांगितले. न्यायालयात परिसरात काम करणाऱ्यांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून न्यायालयीन प्रक्रीया अधिक सक्षम बनविण्यावर भर द्यावा. तसेच ही इमारत स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
वृक्ष संवर्धन काळाजी गरज असून या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी देवून करण्यात आली. यावेळी बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. व्ही.डी. साळुंखे, ॲड. सतिश देशमुख, बार कॉन्सिल ऑफ इंडिया ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोकर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. संदिप भिमराव कुंभेकर यांनी तर आभार जिल्हा न्यायालय भोकरचे युनुस खान खरादी यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर के.पी. जैन देसरडा तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर भोकरचे ए. पी. कराड यांनी केले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. पी. ब्रम्हे, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर, बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. व्ही.डी. सांळुखे, ॲड. सतिश देशमुख, बार कॉन्सिल ऑफ इंडिया ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, जिल्हा न्यायालय भोकरचे युनुस खान खरादी, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव तसेच न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ विधीज्ञ आदीची उपस्थिती होती.
#AtulSave #AshokChavan #CMOMaharashtra #विभागीयमाहितीकार्यालय,लातूर