उल्हास नदीच्या किनाऱ्यावर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण होणार
अंबरनाथ, ( अशोक नाईक ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बदलापूर शहरात आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे बदलापूर शहरात आगमन झाल्यानंतर बुधवारी वाजत गाजत जल्लोष पूर्ण वातावरणात भव्य दिव्य मिरवणूक काढून उल्हास नदीच्या किनाऱ्यावर या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अगोदर १८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
बदलापूर गावात १९२० पासून शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिरही याच बदलापूर गावात आहे. एकेकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही शिवजयंतीला हजेरी लावली होती. असा या बदलापूरचा इतिहास आहे. त्यामुळे बदलापूर गावाच्या प्रवेशद्वारावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा मानस आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला होता. त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला आणि निधी देखील उपलब्ध करून दिला. पुण्याच्या कार्यशाळेत शिवरायांचा अश्वारूढ पुतळा तयार करण्यात आला.
बुधवारी बदलापुरात अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले. त्यानंतर शहरात अतिशय उत्साहात आणि जल्लोषात स्वागत मिरवणूक काढली. या मिरवणुकी ढोल,ताशे, लेझीम खेळणाऱ्या महिला, घोडे, शिवरायांची वेशभूषा केलेले कलाकार यांच्यासह पारंपारिक वशभूषेत बदलापूरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उल्हास नदीच्या किनाऱ्यावर आणि बदलापूर गावाच्या प्रवेशद्वारावर येत्या शिवजयंतीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता शिवरायांच्या या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.



