शहरातील दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबतचा विषय लवकरच मार्गी लागेल


याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार 

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन 


कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) : महानगरपालिका हद्दीतील दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन करुन कागल तालुक्यातील प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. 


     जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी कसबा कागल येथील म्हाडा गृहप्रकल्पातील वन बीएचके सदनिकेच्या रकमेमध्ये कपात करणे,  लिंगायत समाज कसबा सांगाव (बसवेश्वर मंदिर) जागेबाबत, केंबळी येथील वाटप झालेल्या गावठाण प्लॉटचा ७/१२ करणे व कुंभार समाजातील भूमीहीन लोकांचे अतिक्रमण नियमित करणे, मालकी हक्काच्या जमीनी आदेशात दुरुस्ती करणे,  मौजे पिंपळगाव खुर्द येथील जमीन एकत्रीकरण योजनेच्या नोंदी, आंबेओहोळ प्रकल्पातील संकलन दुरुस्तीची व अन्य प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे, दूधगंगा धरणाच्या धरणग्रस्तांना मोबदला देणे तसेच सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या कागल हद्दीतील प्रलंबित कामांबाबतचा आढावा मंत्री मुश्रीफ यांनी बैठकीत घेतला. त्या त्या विषयाशी संबंधित प्रकरणांची माहिती घेऊन प्रलंबित सर्व प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.




महानगरपालिका हद्दीतील दुकान गाळे व मालमत्तांची दर आकारणी रेडीरेकनरच्या दराने न करता जुन्या दराने करण्याची मागणी दुकान मालकांनी केली असता हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे या विषयाबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.


बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, इचलकरंजी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले, भूसंपादन समन्वयक विवेक काळे, राधानगरी - कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, भूसंपादन अधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे आदी उपस्थित होते.

     महसूल व अन्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व विषयांचा तात्काळ निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केल्या. बैठकीला संबधित प्रकरणांशी संबधित नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

Post a Comment

Previous Post Next Post