कल्याण मंडळ-एकचा पुढाकार
कल्याण ( शंकर जाधव ) : राज्य सरकारच्या निर्णयानुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी सहाय्यक उपकरणे पुरवण्यात महावितरणच्या कल्याण मंडळ-एक या कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांच्या हस्ते गुरुवारी १३ फेब्रुवारी दोन कर्मचाऱ्यांना दुचाकींचे वितरण करण्यात आले.
राज्य सरकारी सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहायक उपकरणे पुरवण्याबाबत सरकारने परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाप्रमाणे मागणी करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना दुचाकी पुरवण्याची प्रक्रिया पूर्ण करून राज्यात प्रथमच कल्याण मंडळ-एक कार्यालयाने या उपक्रमात पुढाकार घेतला. दुचाकींचे वितरण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्य अभियंता मिश्रा म्हणाले, दिव्यांगांना दैनंदिन कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी सहाय्यक उपकरणे महत्वाची ठरणार आहेत. या सुविधेमुळे शारीरिक अपंगत्व असले तरी मनाने खंबीर बनून दिव्यांग कर्मचारी अधिक प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच कल्याण परिमंडळातील इतर कार्यालयांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांना या उपक्रमाचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
याप्रसंगी मानव संसाधन विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक सुशिल पावसकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, प्रहार संघटनेचे अनिल गोसावी, सुप्रिम टीव्हीएसचे अनिल शहाजवाला यांच्यासह कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कल्याण परिमंडलात यापूर्वी चार दिव्यांग कर्मचाऱ्यांना याच उपक्रमांतर्गत दुचाकींचे वितरण करण्यात आले आहे.