- जिल्हाधिकाऱ्यांचा पहिल्याच भेटीत गैरव्यवस्थेवर प्रहार
- तीन केंद्र प्रमुख व ८ पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस
- कॉपी पुरवणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल
नांदेड : मंगळवारपासून १२वीची परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नांदेडमध्ये परिक्षेदरम्यान हलगर्जीपणा दाखविणाऱ्या केंद्र प्रमुखावर,पर्यवेक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. सोबतच परिक्षा केंद्रात अनधिकृतपणे उपस्थित असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. तर कॉपी पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात कोणत्याही केंद्रावर, कुठेही कॉपी करणाऱ्यांची हयगय करू नये तसेच याप्रकरणात पोलिसांनी सक्त कारवाई करावी. याबरोबरच शिक्षण विभागाने आवश्यक त्या सर्व सुविधा पूर्ण करून देण्याच्या सूचना नवनिर्वाचित जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवारी कंधार तालुक्यातील विविध परिक्षा केंद्राना भेटी दिल्या. यादरम्यान, परिक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधांबाबत त्रुटी दिसून आल्या. या प्रकाराबाबत गंभीर आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. नोटीस बजावलेल्या केंद्र संचालकामध्ये भीमशंकर उच्च माध्यमिक विद्यालय, शिराढोण, ता. कंधार, श्री. गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, चिखली ता. कंधार, नेताजी सुभाषचंद्र उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी ता. कंधार यांचा समावेश आहे. याशिवाय परिक्षा केंद्रामध्ये कोणतीही जबाबदारी सोपवली नसताना उपस्थित असणाऱ्या तीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्युनियर कॉलेज पानभोसी येथील सहशिक्षक दहीहंडे गवळी, एम.ए. खान, लिपिक ए.यु.शेख यांचा समावेश आहे.
याशिवाय परीक्षेदरम्यान नकला करण्यास मदत करणाऱ्या बाहेरील व्यक्ती श्रीनिवास अर्जून भुसेवाड, प्रणव अनिल टोम्पे, गणपत जळबा गायकवाड, दस्तगीर खमरोद्दीन, शिवाजी नारायण कदम रा. चिखली यांच्यावर उस्मान नगर पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर यांनी यासंदर्भात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय डी.जी.खरात, एस.एस. नरंगले, सी.डी.सोनटक्के, एस.जी.पाटील, ए.एस. जोगदंड, एम.जी.कांबळे, एस.एम. केंद्रे, एस.बी.गायकवाड या आठ पर्यवेक्षकांनी वर्गामध्ये स्वतः आय कार्ड न वापरणे, बैठक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे, त्यांची आवश्यक तपासणी न करणे, याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
तसेच पुढच्या पेपर पूर्वी सर्व व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात १०७ परीक्षा केंद्रावर बारावीची परिक्षा सुरू झाली आहे. आज इंग्रजीच्या पेपरला ४१ हजार८९८ पैकी ४० हजार ९५o विद्यार्थी उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.