कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आज ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी देशभक्तीपूर्ण वातावरणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात सकाळी ७.३० वाजता महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, महापालिका उपायुक्त, सचिव तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजवंदनानंतर अग्निशमन दल, सुरक्षा दल, स्थानिक पोलीस दल तसेच एमएसएफच्या जवानांनी शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. याच प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागातील १२ गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा महापालिका आयुक्त व उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या जुन्या डोंबिवली (पूर्व) विभागीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पालिका सदस्य मंदार हळबे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तद्नंतर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमास कॅप्टन विनयकुमार सचान यांचे बंधू, पालिका सदस्य मंदार हळबे, आसावरी नवरे, खुशबू चौधरी, महापालिका अधिकारी-कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी डोंबिवलीतील प्रेरणा वॉर मेमोरियल येथेही पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना मानवंदना दिली.
यानंतर डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौक येथे उभारण्यात आलेल्या दीडशे फुटी उंच राष्ट्रध्वजाला महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी भारतीय संविधानातील मूल्ये दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले तसेच सुजाण नागरिक म्हणून समाजासाठी आपण कसे योगदान देऊ शकतो, याचा विचार करण्याचे आवाहन केले. त्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आमदार राजेश मोरे यांनीही उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सर्व कार्यक्रमांना आमदार राजेश मोरे, पालिका सदस्य, महापालिका अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेत उत्साहात साजरा करण्यात आला.