मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा
पेण : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणार नसल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन सरकारने नवीन निकष लावल्यानंतर अनेक महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नवीन निकषानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना आतापर्यंत दिली गेलेली लाभाची रक्कम परत मिळणार अशी चर्चा पसरली होती. त्यामुळे अनेक महिलांनी नाराजी देखील व्यक्त केली होती मात्र आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या चर्चेला विराम देत कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नसल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर अपात्र वगळता सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असल्याचे देखील मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात आले आहे. यामध्ये कोणाचा समावेश आहे, हे पाहूयात.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - २,३०,०००
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला - १,१०,०००
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला - १,६०,०००
एकूण अपात्र महिला - ५,००,०००