एमडी, चरस, गांजा विक्री करणारे ४ जण ताब्यात
कल्याण ( शंकर जाधव ) : अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी बनविलेल्या विशेष पथकाने डोंबिवली व कल्याण परिसरात गस्त घालून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत एम.डी., गांजा आणि चरस विक्री करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील श्रीनाथ यादव याला डोंबिवली पूर्वेकडील सुदर्शन मार्बल समोर ८.४८ ग्रॅम वजनाच्या १६,५०० रुपये किमतीच्या एम.डी. पावडरसह अटक करण्यात आली. त्याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर महादेव गिरी याला दुर्गामाता चौक, भटेला तलाव, कल्याण पूर्व येथे तब्बल ९ किलो ९५० ग्रॅम वजनाचा, १ लाख रुपये किमतीचा गांजा विक्रीसाठी आणत असताना बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने रंगेहाथ पकडले.
सचिन एकनाथ कावळे आणि अमन विंद गुप्ता उर्फ पप्पू या दोघांना डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ येथे अमली पदार्थांसह अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २३.५३ ग्रॅम वजनाचा एम.डी. पावडर आणि १० ग्रॅम चरस असा एकूण ९३,९४३/- रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
१ जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत विशेष पथकाने एकूण १३ गुन्हे दाखल केले असून, १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६३ ग्रॅम एम.डी. पावडर, २३२ कोडीनयुक्त बाटल्या, नशेच्या गोळ्या आणि ४७ किलो ०४४ ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण १२ लाखांहून अधिक किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
या कारवाईत पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या आदेशाने आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने प्रभावी कामगिरी बजावली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, पोलीस नाईक शांताराम कसबे, पोलीस शिपाई गौतम जाधव, राजेंद्र सोनावणे तसेच डोंबिवली, मानपाडा व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.