अलिबागमध्ये दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन

Maharashtra WebNews
0


अलिबाग (धनंजय कवठेकर) : मैफिल, अलिबाग या संस्थेतर्फे येथील आरसीएफ वसाहतीमध्ये ८-९ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात  विख्यात वहाणे भगिनी यांची सतार- संतूर जुगलबंदी, युवा गायिका कस्तुरी देशपांडे - मांजरेकर हीचे शास्त्रीय गायन आणि अभिजित पोहनकर यांचा लोकप्रिय  बॉलीवुड घराना हा फ्यूजन कार्यक्रम अशी  भरगच्च सांगीतिक मेजवानी आहे. 


मैफिल, अलिबाग ही संस्था आरसीएफच्या सहयोगाने गेली पस्तीस वर्षे दर्जेदार संगीताचे देखणे कार्यक्रम आयोजित करीत आहे. अलिबागसह रोहा, पेण, मुरुड, रेवदंडा तालुक्यापर्यन्त सभासद वर्गाचे क्षेत्र पसरलेल्या या संस्थेने आजवर उस्ताद झाकीर हुसैन, पं शिवकुमार शर्मा, पं हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद शहीद परवेझ, पं उल्हास कशाळकर, उस्ताद डागर बंधू, पं वेंकटेश कुमार, विदुषी प्रभा अत्रे, अश्विनी भिडे यांसारख्या जगदविख्यात बुजुर्ग कलाकारांसह अनेक युवा व स्थानिक कलाकारांचे  अभिजात संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 

 कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या मैफिलच्या परंपरेनुसार या वर्षीच्या ८-९ फेब्रुवारीच्या महोत्सवात पहिल्या दिवशी वाहने भगिनी आणि प्रतिभाशाली उदयोन्मुख गायिका कस्तुरी देशपांडे यांचे सादरीकरण होणार आहे. 

मूळची अलिबागचीच असलेल्या कस्तुरी देशपांडे हिने गायनाचे प्राथमिक धडे शीतल कुंटे यांच्याकडे घेतले व पुढे निषाद बाक्रे,  गौरी पाठारे  यांच्याकडे पुढील शिक्षण घेतले. सध्या पं बबनराव हळदणकर यांच्याकडे कस्तुरी तालीम घेत आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देणाऱ्या येणारी राष्ट्रीय शिष्यवृत्तीही कस्तुरीला मिळाली आहे. भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शिष्यवृत्ती, देवल क्लब कोल्हापूरचा जयपूर गायकी विशेष पुरस्कार व गानवर्धन, पुणे संस्थेचा पं. त्र्यंबकराव जानोरीकर पुरस्कार, आयआयटी मुंबईच्या मूड इंडिगो २०१५चे विजेतेपद यांच्यासह अन्य पुरस्कारांनीही कस्तुरीला सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या मास्टर ऑफ आर्ट्स  या परीक्षेत विद्यापीठातून प्रथम येण्याचा बहुमान कस्तुरीने पटकाविला असून, पदवी परीक्षेतही तत्वज्ञान विषयात प्रथम क्रमाकांवर आपले नाव कोरले होते. त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत सुवर्णपदक देऊन तिचा गौरव करण्यात आला होता. सध्या भारतीय शास्त्रीय संगीतावर ती पीएचडी करत आहे. या कार्यक्रमात तिला स्वप्नील भिसे तबल्यावर तर संवादिनीवर निनाद जोशी यांची साथ लाभणार आहे. 

याच दिवशी 'वाहने सिस्टर्स' नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रकृती  आणि संस्कृती या दोन्ही बहिणी शृतिशील उद्धव यांच्या तबलासाथीने सतार संतूर जुगलबंदी सादर करणार आहेत. प्रकृती संतूर वादनात तर संस्कृती सितार वादनात पारंगत आहेत. त्यांच्या वादनाची विशेषता म्हणजे राग, गायकी आणि तंत्रकारी अंगाची शुद्धता, ज्यामुळे त्यांची जुगलबंदी अत्यंत प्रभावी ठरते. त्यांचे वडील, डॉ. लोकेश वाहने, स्वतः एक सुविख्यात सितार वादक आहेत आणि त्यांनीच आपल्या मुलींना संगीताचे प्राथमिक शिक्षण दिले आहे आणि सध्या त्यांना दिग्गज उस्ताद शाहिद परवेझ आणि पंडित सुरेश तळवलकर शिकवत आहेत. बहिणींनी अनेक महोत्सवांमध्ये सादरीकरण केले आहे. 

संगीत महोत्सवात रविवारी संध्याकाळी अभिजित पोहनकर प्रस्तुत लोकप्रिय कार्यक्रम ' बॉलिवूड घराना ' हा कार्यक्रम सादर होणार आहे.  भारतीय शास्त्रीय संगीत आणि बॉलीवूड गाण्यांचा अनोखा संगम सादर करतो. या कार्यक्रमात अभिजीत पोहनकर यांनी शास्त्रीय संगीताच्या बंदिशी आणि बॉलीवूडच्या हिट गाण्यांना एकत्रित करून एक नवीन ध्वनी निर्माण केला आहे. उदाहरणार्थ, 'पिया तू अब तो आजा' हे गाणे आणि 'धोलन मेंदे घर आ' ही शास्त्रीय बंदिश यांचे मिश्रण या कार्यक्रमात सादर केले जाते. 


अभिजीत पोहनकर यांच्या नेतृत्वाखालील बँडमध्ये मुख्य गायिका भाव्या पंडित, शास्त्रीय गायक गंधार देशपांडे, गिटारवादक सौरभ जोशी, बास गिटारवादक राहुल देव, आणि तालवादक केयूर बारवे यांचा समावेश असलेला हा अनोखा कार्यक्रम अलिबागकरांना एक वेगळाच आनंद देऊन जाईल यात शंकाच नाही.

अलिबाग परिसरातील संगीतप्रेमी रसिकांनी मैफिल आयोजित या सांगीतिक मेजवानीला बहुसंख्येने हजर रहावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमचा आस्वाद घेऊ इछिणार्‍या संगीत रसिकांनी दीपक दुधाटे 92840 75971 किंवा गणेश कुलकर्णी 99704 50501 यांच्याशी संपर्क साधावा.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)