श्री मुंब्रेश्वर महादेव नववर्ष स्वागत समितीचा उपक्रम
दिवा \ आरती परब ; मराठी नववर्ष गुढीपाडवानिमित्त मुंब्रा शहरामध्ये श्री मुंब्रेश्वर महादेव नववर्ष स्वागत समितीच्या वतीने मुंब्रा स्टेशन येथील शनी मारुती मंदिर परिसर ते मुंब्रेश्वर महादेव मंदिर अशी भव्यदिव्य स्वागत यात्रा काढण्यात आली. माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सर्व धर्मियांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. गेली चौदा वर्षे मुंब्रा शहरामध्ये नववर्षा निमित्त सर्वधर्मियांच्या सहभागातून स्वागत यात्रा काढण्यात येते. यामध्ये मुंब्रा कौसा तसेच दिवा, शिळ, कल्याण फाटा, चौदा गावे परिसर येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या स्वागत यात्रेमध्ये संघर्ष सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा ऋता आव्हाड, माजी नगरसेवक सुधीर भगत, सय्यद अली, विजय कदम, महेंद्र कोमुर्लेकर, सुनिता सातपुते, नंदकुमार फुटाणे ,उषा आढळ,तात्यासाहेब माने, सुमित सुभाष भोईर, सुदाम भगत उपस्थित होते. या शोभायात्रेत, हिरालाल विश्वकर्मा, बापू मखरे, कांती वाघमारे, दीपक सिंगरे, नितीन मोरे, विजय पाटील,संगीता दवणे , जयसिंग राजपुरोहित आदी सर्वधर्मीय समाजातील लोक सहभागी झाले होते.
या शोभायात्रेमध्ये ध्वज पथक, ढोल पथक, चलचित्र, गोंधळी, आराध्याचा मेळा, साहसी खेळ, लेझीम पथक, भजन मंडळे, पालखी विविध वेशभूषा केलेले कलाकार सहभागी झाले होते. मुंब्रेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात येऊन यात्रेची सांगता झाली. त्यावेळी स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांना विविध पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले. या स्वागत यात्रेला पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व त्यांचे सहकारी तसेच वाहतूक विभागाचे अधिकारी व पोलीस दलासह कार्यरत होते.