कल्याण/ शंकर जाधव : महिला दिनाचे औचित्य साधून काल मुंबई विद्यापीठ उपकेंद्राशेजारी, आधारवाडी stp च्या बाजूला आणि राणी लक्ष्मीबाई उद्यान संतोषी माता रोड कल्याण पश्चिम अशा तीन ठिकाणी आकांक्षी शौचालयांचे (Aspirational Toilets) लोकार्पण महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्याहस्ते करण्यात आले.
सदर आकांक्षी शौचालये,आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऑटोमेटेड स्वरूपाची आणि इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करून सुसज्ज स्वरूपात बांधण्यात आली आहेत. या स्मार्ट शौचालयांमध्ये स्मार्ट सेन्सर्स ,ऑटोमेटेड वॉश बेसिन, हँड ड्रायर, चाइल्ड फीडिंग रूम सॅनिटरी नॅपकिन्स वेन्डिंग मशीन, फ्लशिंग व फ्लोअर वॉश सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे,यामुळे पाण्याची व विजेची बचत होणार आहे. सदर शौचालयांमध्ये कॉइन कलेक्शन सिस्टीम, रिमोट सेन्सिंग चा वापर करण्यात आलेला आहे. उपरोक्त शौचालयाचे बांधकाम हे उच्च प्रतीचे स्थापत्य मटेरियल वापरून तयार करण्यात आलेले आहे. सदर शौचालयांमध्ये दिव्यांगांसाठी तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
आजच्या काळाची गरज पाहता महिलांचे आरोग्य व स्वच्छता या बाबी लक्षात घेऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून आकांक्षी शौचालय महिलांना समर्पित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी दिली. या सुसज्ज शौचालयामुळे कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील नागरिकांना आधुनिक पद्धतीची स्वच्छ सुविधा प्राप्त होणार आहे.
सोमवारपासून स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात महापालिका परिक्षेत्रात होत आहे, स्वच्छतेमध्ये महिलांचे योगदान मोठे असते त्यामुळे नागरिकांनी विशेषतः महिलांनी शहराच्या स्वच्छतेत आपला सहभाग द्यावा आणि महापालिकेचे स्टार रेटिंग वाढवण्यासाठी सहकार्य करावे असेही आवाहन महापालिका आयुक्त यांनी यावेळी केले. या लोकार्पण समयी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त अतुल पाटील, संजय जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता योगेश गोटेकर, माजी पालिका सदस्य सुनील वायले, शालिनी वायले, गणेश जाधव, वीणा जाधव इतर मान्यवर महापालिकेचा अधिकारी वर्ग उपस्थित होता.