कोणतीही करवाढ, नवा प्रकल्प न करणारा अर्थसंकल्प सादर


कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

अंबरनाथ/ अशोक नाईक  : चौथ्या मुंबईच्या दिशेने विकास मार्गावर असलेल्या कुळगाव - बदलापूर शहराचा विस्तार आणि विकास झेपावत असताना कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचा २०२५-२६ या अर्थसंकल्पात ६१९ कोटी ५७ लाख जमा उत्पन्न, तर ६१९कोटी ५२ लाख रुपये खर्चासह ५ लाख ४ हजार रुपयाचे शिलकी अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना लेखापाल विकास चव्हाण यांनी गुरुवारी सादर केले. दरम्यान या अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या प्रकल्प विकासकामांसाठी तरतूद करण्यात आलेली नाही. कोणतीही करवाढ नसल्याने बदलापूरकरांना दिलासा मिळाला आहे.


कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत गेली ५ वर्षांपासून प्रशासकीय राजवट असून लोकप्रतिनिधी नसल्याने पाचवे अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना लेखापाल विभागाने २०२४- २५चे सुधारित आणि २०२५-२६चे अंदाजपत्रक गुरुवारी सादर केले. एकूण ६१९.५७ लाख रुपये उत्पन्नाचा,तर ६१९ कोटी५२ लाख रुपये खर्चासह ५ लाख ४ हजार रुपये शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ केलेली नाही. तसेच कुठलीही नवीन प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आलेले नाही. सदर अर्थसंकल्प हा मंजुरीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.दरम्यान नगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन स्त्रोत शोधण्याचा प्रयत्नही प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी म्हटले आहे.


अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी

 रस्ते बांधणी २.५ कोटी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) १०० कोटी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना (जिल्हास्तर) ५० कोटी, घनकचरा व्यवस्थापन ३४ कोटी, आपत्ती व्यवस्थापन २५ लाख, उद्यान विकास ७५ लाख, पथदिवे देखपाल दुरुस्ती ४.२५ कोटी, नालेसफाई ५० लाख, वृक्ष लागवड व‌ संवर्धन ११ कोटी, दिव्यांग कल्याण योजना १.३९ कोटी, ज्येष्ठ नागरिकांना सेवा-सुविधा १० लाख, महिला, बालकल्याण १.३९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post