स्थानिकांकडून वणवा लावला जात असल्याचा वनविभागाचा आरोप
अंबरनाथ / अशोक नाईक : अंबरनाथ शहराची भौगोलिक रचनाच मुळी उंच-सकल टेकडी भागात हरित पट्ट्याने व्यापलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून लगतच्या जंगलात मानवी आक्रमण वाढू लागले आहे. पूर्वी लोकवस्ती पासून दूर असलेल्या वनक्षेत्रालगत मानवी आक्रमण हळूहळू वाढत गेलं, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून वणवा लागण्याच्या घटना वाढत असताना, शुक्रवारी दुपारच्या सुमारास अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात वनविभागाच्या संरक्षित वनक्षेत्रात मोठा वणवा पेटला. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी अंबरनाथ अग्निशमन दलाला पाचारण करत अग्निशमन दलाच्या पथकाने वणव्यात घुसून सदरचा वणवा काबूत आणून विझवला. यावेळी वन विभागाचे अधिकारी वैभव यांनीही वणवा विझवण्याचा प्रयत्न केल्यानंतर या भागात गर्दुल्ल्यांचा वावर असून हे वणवे जाणीवपूर्वक लावले जात असल्याचा आरोप केला आहे.
अंबरनाथ आणि बदलापूरच्या सीमारेषेवरील फॉरेस्ट नाका परिसरात मोठे संरक्षित वनक्षेत्र आहे. या भागात चांगला वनपट्टा सुरक्षित आहे. या वनस्पती साग व इतर मोठी झाडे आहेत. मात्र लोकवस्ती असून स्थानिक गर्दुल्ले, दारूड्यांचा या भागात मोठा वावर आहे. या वनक्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून वारंवार वणवा लागल्याच्या घटना घडत असताना, हे राखीव वनक्षेत्र मानवी दाट लोकवस्ती लगत आहे. या वस्तीमधील लोकांकडून प्लास्टिक सदृश्य कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो. त्या कचऱ्याला आग लावताना ती आग या जंगल परिसरात पसरते. अशा वारंवार घटना घडल्या आहेत. या वस्तीतील लोक शौचालयासाठी जाताना त्यांना झाडाझुडपांची अडचण होते, तेव्हा सुद्धा आग लावण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वेळा येथील आजूबाजूच्या लोकांना सतर्क करण्यासाठी विनंती आवाहन केलेले आहे. या भागात गर्दुल्ले, दारूड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून हे वणवे जाणीवपूर्वक लावले जात असल्याचा आरोप वनविभागाचे अधिकारी वैभव वाइंबे यांनी करत या परिसरात कचरा टाकू नये आणि पेटवू नये तसेच वणवा लागला असल्यास त्याची माहिती वन विभागाला द्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.