जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे मत
कोल्हापूर/ शेखर धोंगडे : महिलांनी अधिक सक्षम होण्याकरिता आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने करावा, जेणेकरुन ग्राहक वस्तू आणि उत्पादनाबद्दल समाधानी झाले तर तुमचा व्यवसाय यशस्वी होईल. आताच्या काळात महिला सर्वच क्षेत्रात सहभागी होण्याचे प्रमाण वाढले असून पुरुषांपेक्षा महिला कोणतेही काम उत्तम प्रकारे करु शकतात, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महिला बचत गटांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूरच्या वतीने तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाद्वारे उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया कोल्हापूर गणेश गोडसे, इम्रान इनामदार, RHS, ICICI बँक कोल्हापूर, संजयकुमार मंडल, RHS, Union बँक, कल्पेश उमराणीकर, जिल्हा समन्वय अधिकारी, माविम, उपस्थित होते.
नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उधम विकास प्रकल्प बचत गटाअंतर्गत उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये जवळपास ४१ बचत गटाद्वारे विविध प्रकारचे साहित्य विक्रीस ठेवण्यात आले होते. दि. १० मार्च पर्यंत विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून शहरातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि महिलांनी तयार केलेल्या घरगुती साहित्य खरेदी करावे, असे आवाहन गोडसे यांनी केले. महिला बचत गटांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, बचत गटातील महिलांची बँक परतफेड व्यवस्थित आहे त्यामुळे बचत गटांना कर्ज देण्याकरिता बँकांना कोणताही धोका जाणवत नाही.
संजयकुमार मंडल यांनी महिलांना डिजिटल साक्षरतेविषयी मार्गदर्शन करताना ऑनलाईन व्यवहाराचे फायदे व धोके तसेच महिलांनी ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक अधिकारी कल्पेश उमराणीकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय कलकुटकी, सुजाता कणसे, सारिका जाधव, जितेंद्र जाधव सर्व सीएमआरसी व्यवस्थापक उपजीविका सल्लागार लेखापाल व सर्व सहयोगिनी, सीआरपी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार लेखाधिकारी पवन कुलकर्णी यांनी मानले.