अंबरनाथ \ अशोक नाईक : हिललाईन पोलीस स्टेशन उल्हासनगर-५ तसेच गंगामाता वाहन शोध संस्थेने गुन्ह्यातील जप्त व रेकॉर्डवरील बेवारस १२५ वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात बऱ्याच वर्षांपासून धुळखात पडून आहेत. ऊन, वारा, पावसामुळे त्यांना गंज लागून वाहनांची झीज झाली आहे. बऱ्याच वाहनांवरील रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर, इंजिन नंबर गंजलेले आहे. त्यामुळे शोध घेताना अडचण येत आहे. तसेच सदर ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने पोलिसांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बेवारस वाहने ज्या मालकांचे आहेत.त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे हिललाईन पोलीस स्टेशन येथे दाखवून घेऊन जाणे बाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. तरी देखील अद्याप पर्यंत काही मालक यांनी दावा केलेला नाही. सदर वाहनांचा पोलिसांकडून लिलावाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. असे आवाहन हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी केले आहे.
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, उल्हासनगर परिमंडळ -४ चे पोलीस उप- आयुक्त सचिन गोरे, अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी बेवारस वाहनांच्या मालकाचा शोध घेऊन ती वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे (गुन्हे), हिललाईन पोलीस स्टेशन तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मालकर, व स्टाफ तसेच मुद्देमाल कारकून पोहवा ३५८५ माने, मपोहवा२५९५ देशपांडे यांचे पथक नेमून त्यांना आदेश दिले.
नमूद पथकाने परंदवाडी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांची माहिती काढून त्यांची मदत घेतली. राम उदावंत यांनी हिललाईन पोलीस स्टेशन येथे येऊन सर्व वाहनांची पाहणी केली असता, हिललाईन पोलीस स्टेशनच्या परिसरात बेवारस व कोणत्याही नोंदी नसलेले असे एकूण १११ मोटारसायकली,८ रिक्षा, ६ चारचाकी वाहने असे एकूण १२५ वाहने मिळून आली आहेत. वाहनांवरील चेसिस नंबर,इंजिन नंबर क्रमांकावरून वाहनाचे मूळ मालकाचा शोध घेतला. संस्थेच्या मदतीने वाहनमालकांना २ पत्र पाठवून वाहन मालकांना वाहने परत घेऊन जाण्याबाबत आव्हान केले. सदर कारवाईच्या अंतर्गत ३ मोटारसायकली व १ रिक्षा यांचे मालक मिळून आले असून त्याबाबत इतर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याने त्या परत देण्याची प्रक्रिया चालू आहे.
हिललाईन पोलीस स्टेशनच्या आवारात मिळून आलेली एकूण १११ मोटारसायकली,८ रिक्षा, ६ चारचाकी वाहने असे एकूण १२५ वाहनांच्या लिलावाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी सांगितले आहे.