सुसंस्कारित पिढीसाठी मूल्यसंस्काराची जोड द्या

 



परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे आवाहन 


नाशिक  : देशात सुसंस्कारित पिढी निर्माण होण्यासाठी मूल्यसंस्कार तथा बालसंस्कार विभागाला प्राधान्य द्या, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली  आण्णासाहेब मोरे यांनी केले तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्‍यांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला.

हनुमान जन्मोत्सवाच्या शुभपर्वावर (१२ एप्रिल) साप्ताहिक सत्संग श्री क्षेत्र गुरुपीठ येथे पार पडला. या निमित्ताने राष्ट्रहितासाठी देशभरातून आलेल्या सेवेकर्‍यांनी एक दिवसीय गुरुचरित्राची सेवा श्रींच्या चरणी अर्पण केली. यावेळी गुरुमाऊलींनी सेवेकऱ्यांना संबंधित केले.

गुरुमाऊली श्री मोरे आपल्या हितगुजमध्ये म्हणाले की,सेवामार्गाच्या सर्व १८ विभागांमध्ये मूल्यसंस्कार विभाग हा पाया आहे. तेव्हा ग्राम अभियान राबविताना मूल्य संस्काराचीही जोड द्यावी. देशात सुसंस्कारित आदर्श पिढी घडविण्यासाठी सेवामार्गाने मूल्यसंस्कार विभागाला झुकतेमाप दिले असून सेवानिवृत्त मंडळींनी या पवित्र कार्यात झोकून देऊन काम केले पाहिजे.  मूल्य संस्कार  विभागाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि काळाची गरज ओळखून नाशिकमध्ये १ मे २०२५ रोजी भव्य- दिव्य स्वरूपात मूल्यसंस्कार मेळावा तथा गुरु-मातृ-पितृ पाद्यपूजनाचा समाजोपयोगी उपक्रम आयोजित केला आहे. सर्वांनी यामध्ये अवश्य सहभाग नोंदवावा. असे आवाहन त्यांनी केले.

 ते पुढे म्हणाले की,स्वामी कार्य हे देश,धर्म आणि समाजहिताचे कार्य असून या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, सामाजिक ऐक्य,  सामुदायिक सहजीवन जोपासले जाते. सेवेकर्‍यांनी आपापल्या मुला-मुलींचे कमी खर्चात विवाह करावेत. त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शहीद जवानांच्या मुलामुलींच्या विवाहासाठी जमेल त्याप्रमाणे योगदान द्यावे. ही माणुसकीची संस्कृती आपल्याला वृद्धिंगत करायची आहे. 

सत्पुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करताना त्यांचे जीवनादर्श अंगीकारले पाहिजेत आणि समाजातील दुःखी कष्टी पीडित बाधित लोकांचे कष्ट निवारण्यासाठी योगदान दिले पाहिजे. हीच खरी मानवसेवा आहे. असेही त्यांनी नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post