कोल्हापूर \ शेखर धोंगडे : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांची सन २०२३-२४ या वर्षाकरिता वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर विभागातील एकूण २१ बाजार समित्यांपैकी, पंधरा बाजार समित्या राज्यातील पाहिल्या १०० क्रमवारीमध्ये आल्या आहेत. कोल्हापूर विभागातील आटपाडी बाजार समिती कोल्हापूर विभागांमध्ये प्रथम क्रमांकावर असून, फलटण बाजार समिती द्वितीय व लोणंद बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर आहे. आटपाडी बाजार समिती राज्यस्तरावर २२ व्या क्रमांकावर असून फलटण बाजार समिती २४ तर लोणंद बाजार समिती २९ व्या क्रमांकावर आहे.
यामध्ये बाजार समितीकडे उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा व इतर सुविधा याकरिता ८० गुण, बाजार समितीचे आर्थिक निकष याकरिता ३५ गुण, बाजार समितीचे वैधानिक कामकाज याकरिता ५५ गुण, इतर विशेष निकष करिता ३० गुण देण्यात आले होते. एकूण २०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांच्या आधारे बाजार समित्यांची राज्यस्तरीय क्रमवारी देण्यात आली आहे. राज्याच्या पणन संचालनालयाकडून स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी कक्ष यांच्याकडून राज्यस्तरीय क्रमवारी घोषित करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय क्रमवारीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कोणत्या बाजार समितीमध्ये विक्री करावा याचा विचार करुन शेतकरी आपला शेतमाल संबंधित बाजार समितीमध्ये पाठवू शकतात.बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा तसेच बाजार समितीचे आर्थिक व्यवहार, त्याचप्रमाणे कृषी पणन कायद्यानुसार बाजार समितीमध्ये चालणारे कामकाज, या विविध बाबींचा विचार करुन ही क्रमवारी देण्यात आलेली आहे. यामध्ये आटपाडी सारखी तालुका स्तरावरील बाजार समिती शेतकऱ्यांसाठी राबवीत असलेल्या विविध योजना, व्यापाऱ्यांसाठी असणाऱ्या सोयी सुविधा या अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध करुन दिल्या आहेत. शासनाच्या विविध योजनांअंतर्गत शेतकऱ्यांसाठी व बाजार आवारातील विविध घटकांसाठी सर्वाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न बाजार समितीने केला आहे.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी, हमाल, मापाडी व इतर घटक यांच्यासाठी विधायक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. फलटण येथील शेतकरी समस्या निवारण कक्षाचे कामकाज, कार्डीयाक ॲम्ब्युलन्स, पेट्रोल पंप आणि शेतकऱ्यांसाठी अल्पदरात जेवण यामुळे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज लोकाभिमुख राहिले आहे. यामध्ये बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव, सर्व संचालक मंडळ व बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे.