घरगुती गॅस दरवाढीमुळे महिलांचे बजेट कोलमडले
दिवा \ आरती परब : गेल्या आठवड्यात घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यातच आजपासून घरगुती पीएनजी आणि वाहनांच्या सीएनजी गॅसची दरवाढ झाल्याने भाजप सरकार विरोधात आज संतापाचा उद्रेक होऊन दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाचा सरकारला दणका दिला.
मुंबईसह उपनगरात आज पासून सीएनजी दीड रुपयाने तर पीएनजी म्हणजे घरगुती पाईप गॅस एक रुपयाने महागला आहे. त्यामुळे आता सीएनजी ७९.५० रुपये प्रति किलो तर पाईप गॅस प्रति युनिट ४९ रुपये झाला आहे. घरगुती गॅस साठीचा खर्च वाढला असून डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारल्यामुळे गॅसच्या किमती वाढवाव्या लागल्याचे एमजीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हेच का मोदींचे अच्छे दिन, असा सवाल करत दिव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महिलांनी चुलीवर भाकरी बनवून भाजप सरकारचा निषेध केला.
सिलिंडरच्या सबसिडीच्या नावाखाली हे सरकार लोकांची फसवणूक करत आहेत. देशात उज्वला योजना राबवून मोदींनी मन की बात मध्ये म्हटले होते की महिलांचे धुराचे अश्रू मला पहावत नाहीत म्हणून उज्वला योजना राबवण्यात आली. परंतु आज याच सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले असून सामान्य महिलांचे हाल होत आहेत व पुन्हा चुलीवरती जेवण बनवण्याची परिस्थिती देशात मोदी सरकारने आणली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीने गॅस दरवाढी विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, दिवा महिला शहर संघटिका ज्योती पाटील, विभाग संघटिका मयुरी पोरजी यांनी केले, यावेळी उपशहर प्रमुख तेजस पोरजी, उपशहर संघटक प्रवीण उतेकर, विभाग प्रमुख नागेश पवार, संजय जाधव, रवी रसाळ, शनिदास पाटील, उपविभाग प्रमुख अजित माने, शाखाप्रमुख राजेश गुप्ता, मूर्ती मुंडे, नितीन काळे,विजय कदम, विभाग संघटिका सुवासिनी गुडेकर, उप संघटिका आशा इंगोले, शाखा संघटिका संगीता मचाडो, स्वाती चव्हाण आधी कार्यकर्ते उपस्थित होते.