प्रेमविवाहातून मुलीची हत्या, जावई गंभीर जखमी
जळगाव : चोपडा तालुक्यातील एका विवाहसोहळ्यात माजी सीआरपीएफ उपनिरीक्षकाने मुलीने केलेल्या प्रेम विवाहाच्या रागातून मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्या. यामध्ये मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून या वडिलांनी हा थरकाप उडवणारा प्रकार केला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण मंगळे (वय ५०, सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी) हे आपल्या कुटुंबासह चोपडा तालुक्यातील एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. त्यांच्या मुलीने, त्रुप्ती मंगळेने (वय २५) सुमारे वर्षभरापूर्वी पुण्यात अविनाश वाघ या तरुणाशी प्रेमविवाह केला होता. किरण मंगळे यांनी या विवाहास सुरुवातीपासून तीव्र विरोध दर्शवला होता.
लग्नसमारंभात त्रुप्ती आणि अविनाश अचानक उपस्थित राहिल्याची माहिती मिळताच, संतप्त झालेल्या किरण मंगळे यांनी आपल्या वैध परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने दोघांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्रुप्तीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती अविनाश गंभीर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत अविनाशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेनंतर लग्नसमारंभात एकच गोंधळ उडाला. संतप्त नातेवाईकांनी आरोपी किरण मंगळे याला पकडून मारहाण केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मंगळे यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या विरोधात खून व खुनाचा प्रयत्न या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक चौकशीतून असे उघड झाले आहे की, किरण मंगळे आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेस धक्का लागल्याच्या भावनेने ग्रासले होते. त्यांच्या दृष्टिकोनातून, मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह हा त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला कलंक समजला गेला. त्यामुळे त्यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. अनेक सामाजिक संघटनांनी ऑनर किलिंगच्या घटनेचा निषेध केला असून, आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले की, "ही घटना केवळ कौटुंबिक वाद नाही, तर ऑनर किलिंगप्रकरणी आम्ही विशेष तपास सुरू केला आहे. समाजात अशा अमानवी कृतींना थारा दिला जाणार नाही."
सध्याच्या घडीला पोलीस तपास सुरू असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.