डोंबिवली \ शंकर जाधव : रस्त्याने चालत असताना एकाला लुटारुंनी चाकूचा धाक दाखवत लुटले. याच रस्त्याने जाणाऱ्या एका इसमाने लुटारुंना विरोध केला असता त्याला बेदम मारहाण करत लुटले.ही घटना शनिवारी डोंबिवली पूर्वेकडील टिळक रोडवर रात्रीच्या वेळी घडली. डोंबिवली रामनगर पोलिसांनी दोन लुटारुंना अटक करून गजाआड केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस देवरुखकर आणि सुजित थोरात ( रा. सोनारपाडा ) अशी अटक केलेल्या लुटारुंची नावे आहेत.डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोडवर राहणारे राहुल चौरसिया हे शनिवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास टिळक रोडवरून पायी जात होते.तेथे दोन इसम एका व्यक्तीला लाथाबुक्क्यानी मारहाण करत त्याच्याकडील पैसे लुटत असल्याचे चौरसिया यांनी पाहिले.ती व्यक्ती मदतीकरता आरडाओरड करत असताना पाहून चौरसिया मदतीला धावले. लुटारुंना विरोध केला असता त्यांनी चौरसिया यांनाही मारहाण करत त्यांच्या खिशातील दोन हजार हिसकावले.पोलीस गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी दोघा लुटारुंना अटक केली आहे.अटक केलेल्या दोघांविरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.