दिवा आरपीएफचे निरीक्षक गिरिशचंद्र तिवारी यांची बदली


निरोप समारंभात सर्व स्टाफ भावूक


दिवा \ आरती परब : दिव्याच्या आरपीएफचे निरीक्षक गिरिशचंद्र तिवारी हे मार्च २०२२ पासून कार्यरत होते. त्यांच्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी दिवा वासियांच्या लोकल प्रवासात येणाऱ्या अनेक समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच तीन वर्षांनंतर झालेल्या बदलीच्या वेळी दिवा आरपीएफचे निरीक्षक गिरिशचंद्र तिवारी यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला त्यावेळी या निरोप समारंभात सर्व स्टाफ भावूक झाला होता.



दिवा स्टेशनला वाढते लोकल प्रवाशी बघता दिवसेंदिवस प्रवासात येणाऱ्या अनेक समस्या दूर करण्याचा प्रयत्न आरपीएफचे निरीक्षक गिरिशचंद्र तिवारी यांनी केला. त्याची परिनिती दिवा स्टेशनवरील फाटकातील गेट न. २९ वरती ट्रेन पासिंगमुळे होणारे जखमी आणि मृतांच्या दुर्घटनांमध्ये १००% कमी आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षात एक सुध्दा प्रवासी जखमीची वा मृत्यूची घटना वरील गेटवरती घडली नाही. गिरिशचंद्र तिवारी यांनी राबवलेले झिरो मिशन डेथ, हे अभियान पूर्णपणे यशस्वी त्यांनी आणि स्टाफने करुन दाखविले. 

रेल संपत्तीच्या चोरीमध्ये सुध्दा घट आली, महिला कोच, दिव्यांग कोच सुरक्षा या गोष्टींकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. मार्च २०२५ मध्ये त्यांना तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली ही मुंबई मंडलच्या दिवा पोस्टवरुन नागपुर मंडळमधल्या जुन्नारदेव पोस्ट वरती झाली असून त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम बुधवारी आरपीएफ थाना दिवा इथे पार पडला. 




कार्यक्रमाच्या वेळी ठाणे उप- मंडळाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त अतुल क्षिरसागर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भुषवीले. कार्यक्रमाच्या वेळी आरपीएफ निरीक्षक मुंब्रा पवन कुमार, निरीक्षक ठाणे- सुरेंद्र कोष्ठा, निरीक्षक मुलुंड मर्कड आर्मोरर, निरीक्षक कल्याण राकेश कुमार, निरीक्षक मुलुंड धनवीज, अन्य स्टाफ व दिवा गावचे माजी नगरसेवक शैलेश पाटील, दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष ॲड. आदेश भगत, दिवा गावचे प्रतिष्ठीत नागरीक चेतन भगत, माजी नगरसेवक अमर ब्रह्मा पाटील, सर्वेश अय्यर, भाजप दिवा शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुत्र संचालकाची कमान लक्ष्मण बेंडकोळी यांनी संभाळली. कार्यक्रमाच्या शेवटी गिरीशचंद्र तिवारी हे आपल्या स्टाफला सोडुन जाताना खुपच भावूक झाले होते. सर्वांनी त्यांना पुढील कार्यकालासाठी व त्यांच्या पुढील उज्वल भविष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

Previous Post Next Post