अंबरनाथ/अशोक नाईक : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या निवासस्थानासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांच्या नेतृत्वाखाली रात्री बारा वाजता मशाल पेटवून आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी निवेदन स्वीकारण्यास आमदार उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करत प्रहार पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत गेटवर निवेदन चिटकवले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी राज्यभरात शेतकऱ्यांची कर्ज माफी, दिव्यांगाना सहा हजार रुपयांचे मासिक मानधन मिळाले पाहिजे या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने रात्री बारा वाजता आमदार डॉ. बालाजी किणीकरांच्या निवासस्थानाबाहेर मशाल पेटवून ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र पूर्व सूचना देऊनही आमदार उपस्थित न राहिल्याने आंदोलनकर्त्यांनी आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गेटवर निवेदन पत्र चिटकवत संताप व्यक्त केला.
पूर्व सूचना देऊनही आमदारांची अनुपस्थिती बेजवाबदार आहे. राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न खूप जिव्हाळ्याचा आहे. सत्य येण्यापूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफी करणार, बाजार हमीभाव देणार आणि दिव्यांगाना सहा हजार रुपये मानधन देणार अशा आश्वासनांचा आता सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे. सरकार पूर्णपणे नकार देत आहे, जसं काय...तर काही झालेलं नाही. अशा पद्धतीने त्यांचं वागणं चालला आहे. त्यामुळे त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही सर्व जमा झालो आहोत. किमान पुढच्या वेळी चर्चा करतील तेव्हा त्यांना आठवणीत तरी राहील... कोणीतरी प्रहारने आंदोलन केल्याचे लक्षात राहील. त्यामुळे आमदार भेटले नाहीत, पण त्यांच्या निवासस्थानासमोर चिटकवलेले हे निवेदन त्यांच्या कायम लक्षात राहील. असा संताप प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.