ठाणे भाजपचे सरचिटणीस विजय भोईर यांनी घेतली भेट
दिवा \ आरती परब) : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात ठाणे भाजपचे सरचिटणीस विजय भोईर यांनी दिव्यातील खारफुटीची कत्तल व डम्पिंग ग्राउंड मुळे होणारा पर्यावरणाचा हास हे दोन प्रमुख मुद्दे मांडले. या प्रश्नावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या, अशी माहिती विजय भोईर यांनी दिली.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात दिव्यातील पर्यावरणाशी कशा प्रकारे खेळ सुरू आहे हे आपण निदर्शनास आणून दिल्याचे विजय भोईर यांनी सांगितले. खाड्या बुजवून अनधिकृतपणे सुरू असलेले डम्पिंग ग्राउंड, तसेच दिव्यातील खारफुटीची वारेमाप होणारी कत्तल याकडे विजय भोईर यांनी लक्ष वेधले. तसेच डम्पिंगच्या प्रदूषणामुळे दिव्यातील लोकांचे आरोग्य धोक्यात येत चालले आहे. हेही भोईर यांनी पंकजा मुंडे यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी पंकजा मुंडे यांनी सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन सदर विषयावर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात सूचना दिल्या असल्याची माहिती विजय भोईर यांनी दिली.
दिवा हा पूर्वी खाडी किनारी असणारी तीवरांची जंगले. त्यामुळे निसर्ग संपन्न तर दिवा होताच, परंतु खारफुटीमुळे संरक्षित सुद्धा होता. परंतु मुंबईपासून जवळ असल्याने इकडे प्रचंड अवैध बांधकामे वाढू लागले. ज्यात आरक्षित भूखंड गिळंकृत तर केले गेलेच मोकळ्या जागा कमी पडू लागल्या म्हणून की काय खारफुटी जंगलांची कत्तल करून खाड्या बुजून निकृष्ट दर्जाच्या बिल्डिंग इथे उभ्या राहत आहेत. ज्यामुळे पर्यावरणाच्या ह्रासा सोबत नागरिकांच्या जीवाशी पण खेळ चालू आहे, असे विजय भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे.
डम्पिंगमुळे प्रचंड दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. डम्पिंग बंद करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार, आंदोलने, निदर्शने करूनही काही उपयोग झालेला नाही. तरी आपणास नम्र विनंती की, आपण सहानुभूतीपूर्वक आमच्या मागण्यांचा विचार करून जनतेला न्याय द्यावा. कारण जर आता कधी २६ जुलै २००५ सारखा पाऊस झाला तर २६ जुलैच्या महापुराची जी हानी झाली त्याहून अनेक पटीने जीवित व वित्तहानी इथे होऊ शकते याची आपण नोंद घ्यावी.