दिवा शहरासाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र स्थापन करावै

Maharashtra WebNews
0


दिवा, कळवा आणि मुंब्राच्या मूलभूत सुविधांबाबत शिवसेना ठाकरे गटाची आयुक्तांसोबत बैठक


दिवा \ आरती परब : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन दिवा, कळवा व मुंब्रा शहरांतील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत नागरिकांच्या आरोग्य, वाहतूक, पाणीपुरवठा, विकास आराखडा आणि पर्यावरण यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले.  दिवा शहरात सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र (WTP) व नवीन जलपुरवठा योजना राबवण्यात यावी. दिवा परिसरात वाढलेल्या बेकायदेशीर कचरा डंपिंग व अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. 

 
दिवा शहरात स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) उभारण्यासाठी नवीन निसारण वाहिन्यांचे जाळे तयार करण्याची विनंती करण्यात आली.  नवीन विकास आराखड्यातील अव्यवहार्य व नागरिकांच्या घरांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रस्तावित रस्त्यांचा फेरविचार करून सल्लागार समिती स्थापनेची सूचना, पुनर्वसनाची योग्य योजना राबवण्याची मागणी करण्यात आली. ठाणे व कळवा परिसरात वाहतूककोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांची पुनर्रचना, सिग्नल यंत्रणांची सुधारणा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याची गरज आहे. 


कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयात आयसीयू व एनआयसीयू बेड अपुरे असून, त्या सुविधांची तातडीने वाढ करून नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीत आयुक्त महोदयांनी सर्व मुद्द्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित विभागांना तात्काळ आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

या शिष्टमंडळात कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, महिला जिल्हा संघटिका वैशाली दरेकर राणे, युवा सेना जिल्हाधिकारी प्रतीक पाटील, माजी नगरसेविका अंकिता पाटील, दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, महिला शहर संघटिका ज्योती पाटील, महिला समन्वयक प्रियांका सावंत, उपशहर संघटिका स्मिता जाधव, मुंब्रा शहर प्रमुख विजय कदम, उपशहर प्रमुख अनिस खुरेशी, महिला शहर संघटिका शाईन घडियाळी, कळवा शहर प्रमुख लहू चाळके, शहर संघटक रविंद्र सुर्वे, महिला शहर संघटिका कल्पना कवळे तसेच सर्व विभाग व शाखा प्रमुख उपस्थित होते.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)