बदलापूर नगरपालिकेने अडीच कोटींच्या 'घंटागाड्या' काढल्या भंगारात !

Maharashtra WebNews
0


अंबरनाथ \ अशोक नाईक : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी अडीच कोटी रुपये खर्चून खरेदी केलेल्या तब्बल ४२ घंटागाड्या गेल्या सात वर्षांपासून वापराविना धुळखात पडून राहिल्याने अखेर सात वर्षानंतर नगरपालिकेने या गाड्या भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून या घंटागाड्यांची कचरा उचलण्याची क्षमता अपुरी आहे. अशी अनेक कारणे पुढे करत घंटागाड्या वापरात आल्याच नाहीत. त्यामुळे यावर्षी त्या वाहतुकीस योग्य नसल्याचा निष्कर्ष काढत अंधारात विकण्याचा निर्णय घेतला. मात्र पालिकेने अडीच कोटी रुपयांचा चुराडा केल्याची संतापजनक प्रतिक्रिया आता नागरिकांमधून उमटू लागली आहे.


कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मागील काही वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांनी करोडो रुपयांचा निधी खर्च केला आहे. २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या अहवालानुसार शहरातील कचरा उचलण्यासाठी ४२ घंटागाड्यांची गरज अहवालात नमूद केली होती. त्याप्रमाणे नगरपालिकेने प्रतिवाहन ५ लाख ८६ हजार ९९० रपये दराने ४२ घंटागाड्या खरेदी केल्या होत्या. जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च केला होता. दरम्यान कंत्राटदाराला या गाड्या देण्यावरून लोकप्रतिनिधी विरोध दर्शवला होता. तसेच सदर घंटागाड्यांची  कचरा उचलण्याची क्षमता अपुरी पडत असल्याचे कारण पुढे करत, या गाड्या वापराविना पडून राहिल्या.


२०२० मध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेने नवीन कंत्राटदार नियुक्त केला. त्याला कचरा उचलण्यासाठी प्रति महिना जवळपास एक कोटी रुपये अदा केले जात आहेत. मात्र गेली सात वर्षे पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात तसेच वडवली विभागात पडून आहेत. अखेर सात वर्षानंतर घंटागाड्या भंगारात काढण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. या ४२ घंटागाड्यांवर जवळपास अडीच कोटी रुपयांचा चुराडा पालिका प्रशासनाने केला. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असताना, घनकचरा व्यवस्थापन होणार कधी ? असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होऊ लागला आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)