- २५ प्रकारच्या शासकीय सेवा घरपोच मिळणार
- ३०२ नागरिकांनी घेतला योजनेचा लाभ
- जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये कार्यान्वित
ठाणे : सामान्य नागरिकांना सरकारी सेवा मिळवण्यासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने १०० दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 'Door Step Delivery' नावाची अभिनव सेवा प्रणाली आता जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी 'Door Step Delivery' उत्तम प्रकारे शासकीय सेवा लोकांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
"सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दारी सेवा उपलब्ध करून देणे, हेच खऱ्या अर्थाने सुशासनाचे प्रतीक आहे. 'Door Step Delivery' उपक्रमाद्वारे आम्ही प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करत आहोत. हा उपक्रम प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प असल्याचे रोहन घुगे ( मुख्य कार्यकारी अधिकारी ) यांनी म्हटले आहे.
या प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या २५ प्रकारच्या शासकीय सेवा मिळू शकतात. प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ४०४ अपॉईंटमेंट नोंदवण्यात आल्या असून, ३०२ नागरिकांना घरपोच सेवा देण्यात आली आहे. उर्वरित अपॉईंटमेंटवर काम सुरू असल्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी दिली.
मृत्यू दाखला, जन्म दाखला, दारिद्र्यरेषेखालील दाखला, ग्रामपंचायतीचा येणे बाकी नसल्याचा दाखला, विवाह नोंदणी दाखला, नमुना नं ८ चा दाखला (मालमत्ता फेरफार), निराधार योजनेसाठी वयाचा दाखला हे सर्व लोकहक्क सेवा आयोगांतर्गत येणारे हे सात दाखले 'Door Step Delivery' मार्फत देण्यात येत असून त्या व्यतिरिक्त इतर विभागाचे जसे जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, उद्योग आधार, जीवन प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज, पॅनकार्ड व दुरुस्ती, पासपोर्टसाठी शपथपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, शेत मोजणी अर्ज, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, राजपत्र प्रकाशन, १५ वर्षाचे रहवासी प्रमाणपत्र, खाद्य परवाना जीवन प्रमाणपत्र, हयात प्रमाणपत्र, आभाकार्ड (आयुष्यमान भारत आरोग्य खाते ) अशा विविध सेवा या प्रणालीद्वारे घरपोच मिळू शकतात. ग्रामपंचायतींच्या केंद्रचालक यांना ही जबाबदारी दिली आहे. केंद्रचालक नागरिकांकडून वेळ ठरवून त्यांच्या घरी येतात, आवश्यक कागदपत्र स्कॅन करतात आणि ऑनलाइन सेवा प्रक्रिया पूर्ण करतात. सेवा मंजूर झाल्यावर संबंधित प्रमाणपत्र पुन्हा घरपोच पोचवले जाते.
नागरिकांनी https://thanedoorstep.in/ या संकेतस्थळावरून अपॉईंटमेंट घ्यावी. किंवा मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक 8380822333 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाकडून सुजाण नागरिकांना घरीच जलद व सुलभ सेवा देण्याचा प्रगत उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात येत आहे