नागपूरमधील कारखान्यात स्फोट ; पाच ठार

Maharashtra WebNews
0



नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी (MIDC) परिसरात असलेल्या MMP इंडस्ट्रीज लिमिटेड या ॲल्युमिनियम फॉइल व पावडर उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये शुक्रवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला असून अकरा कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

स्फोट इतका तीव्र होता की परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल हॉस्पिटल) येथे उपचारासाठी हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करताना वापरण्यात येणारी रसायने अत्यंत ज्वलनशील असतात. उच्च तापमानात या रसायनांचा स्फोट होण्याचा धोका अधिक असतो. मात्र, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

स्फोटाच्या वेळी कंपनीत सुमारे १५० कामगार कार्यरत होते. स्फोटानंतर प्रसंगावधान राखून अनेकांनी वेळेवर बाहेर धाव घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र काही कामगार स्फोटकांच्या जवळ असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. काहीजण गंभीर भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, तसेच अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला व बचावकार्याला गती दिली. पोलिसांनी परिसर सील केला असून, कंपनीतील सर्व कामकाज तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून या घटनेची सखोल चौकशी जाहीर करण्यात आली आहे.

मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून, गरज असल्यास त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची तयारीही सुरू आहे.





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)