उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजनाचे विविध कार्यक्रम
डोंबिवली \ शंकर जाधव : कल्याण-डोंबिवली – शहराच्या सर्वांगीण विकासाचा एक नवा अध्याय उद्या, रविवारी १८ मे रोजी संध्याकाळी ४.३० वाजता वै. ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुल, डोंबिवली (पूर्व) येथे सुरू होणार आहे. या विकास महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध महत्त्वाच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधा, स्वच्छता, पुनर्वसन, पर्यावरणस्नेही उपाययोजना व महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेत विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या महोत्सवात एकाचवेळी सात प्रभागांमध्ये अत्याधुनिक DBFOT मॉडेलवर आधारित कचरा संकलन, वाहतूक व रस्ते स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. या प्रकल्पात २४x७ कंट्रोल रूम, ३५० हून अधिक पर्यावरणपूरक वाहने, जनजागृतीसाठी स्वतंत्र पथक आणि वेस्ट टू वेल्थ केंद्र अशा सुविधा उपलब्ध असून "Litter Free Corridor" या नवकल्पनेद्वारे शहरातील ३०% रस्ते कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या कार्यक्रमात कल्याण-डोंबिवली परिवहन विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेंतर्गत धनादेश वाटप करण्यात येणार आहे. सेवाविवृत्त कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
त्याचबरोबर, टिटवाळा रिंग रोड, कल्याण-बदलापूर रेल्वे कोरिडॉर (MUTP-3), गड्ळस यार्ड आदी प्रकल्पांमध्ये पुनर्वसनामुळे बाधित झालेल्या लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना घराचा हक्क प्राप्त होणार असून, त्यांच्या आयुष्याला स्थैर्य लाभणार आहे.
विकास महोत्सवात टिटवाळा पूर्व भागात ३.७५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या सौरऊर्जेवर आधारित आधुनिक उद्यानाचे ऑनलाइन लोकार्पण करण्यात येणार आहे. या उद्यानात ३५०० देशी वृक्षांचे मानवनिर्मित जंगल, व्यायामासाठी सुविधा, फुलझाडांचे आकर्षक ताटवे, सुंदर जॉगिंग ट्रॅक व फूड कोर्ट आदी घटकांचा समावेश आहे. पर्यावरणपूरक व आरोग्यवर्धक जीवनशैलीसाठी हे उद्यान नागरिकांना नवा अनुभव देणार आहे.
तसेच, खंबाळपाडा येथे उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाचे ऑनलाइन भूमिपूजन करण्यात येणार असून, यामध्ये बास्केटबॉल, खोखो, टेनिस, फुटसूल ग्राउंडसह लँडस्केपिंग, पार्किंग आणि फूड कोर्ट यांचा समावेश आहे. या सुविधांमुळे तरुणांसाठी भक्कम क्रीडा पायाभरणी निर्माण होणार आहे.
महिला सुरक्षेसाठी विशेषतः तयार करण्यात आलेल्या 'दामिनी' पथकासाठी १६ स्कूटींचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शहरात महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि तत्पर पोलीस सेवा कार्यरत राहणार आहे.
या सर्व लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमांसाठी विविध लोकप्रतिनिधी, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, मान्यवर नागरिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शहराच्या सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने एक भरीव पाऊल उचलत आहे. भौतिक सुविधा, स्वच्छता, पुनर्वसन, पर्यावरणसंवर्धन आणि महिला सुरक्षेच्या क्षेत्रात हे उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहेत.