ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर



ठाणेकरांचा अभिमान उंचावणारी गौरवाची नोंद

नवी दिल्ली / ठाणे :  आपल्या अभ्यासपूर्ण व प्रभावी कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. खासदारकीच्या पहिल्याच कार्यकाळात मिळालेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ठाणेकरांसाठी अभिमानास्पद ठरला आहे.

या पुरस्काराची घोषणा प्राइम पॉइंट फाऊंडेशनचे संस्थापक प्राइम पॉइंट श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शिनी राहुल यांनी नवी दिल्ली येथे केली. संसदेत मांडलेले मुद्देसूद प्रश्न, विविध विषयांवरील सखोल भाषणे आणि लोकहितासाठी केलेल्या प्रभावी हस्तक्षेपामुळे खासदार म्हस्के यांची निवड करण्यात आली आहे.

संसद रत्न पुरस्कार हा भारताच्या संसदीय कार्यक्षमतेचा सन्मान करणारा सर्वोच्च दर्जाचा नागरी पुरस्कार मानला जातो. २०१० पासून सुरु झालेल्या या पुरस्काराद्वारे संसदेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या खासदारांना गौरवण्यात येते. यंदाच्या वर्षी देशभरातील विविध खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण करून काही मोजक्या खासदारांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात प्रभावी सहभाग, संसदीय समित्यांमध्ये सक्रिय उपस्थिती आणि विविध राष्ट्रीय विषयांवर अभ्यासपूर्वक भूमिका घेतल्यामुळे त्यांचे काम देशभरात नोंद घेण्याजोगे ठरले आहे. त्यांच्या या पुरस्कारामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आवाज संसदेत प्रभावीपणे पोहोचवला जात असल्याचे स्पष्ट होते.

या सन्मानामुळे ठाण्यात सर्वच स्तरातून आनंद व्यक्त होत असून, विविध सामाजिक, राजकीय आणि नागरी संस्थांनी खासदार म्हस्के यांचे अभिनंदन केले आहे. ठाणे शहराचा आवाज संसदेत जसा ठामपणे मांडला जात आहे, त्याची पावती संसद रत्न पुरस्काराच्या स्वरूपात मिळाल्याने हा क्षण ठाण्याच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा ठरत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post