माजी सैनिक संतोष कुंभार यांची प्रेरणादायी शैक्षणिक वाटचाल

 


दुर्गम भागात सेवा करूनही शिक्षणाची ओढ कायम

कोल्हापूर \ शेखर धोंगडे : देशाच्या संरक्षणासाठी दुर्गम आणि कठीण परिस्थितीत कार्यरत असतानाही शिक्षणाची ओढ न हरवणारे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एरंडोली गावचे माजी सैनिक संतोष कुंभार हे दूर शिक्षणाचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. त्यांनी कारगिल, जम्मू-काश्मीरसारख्या अत्यंत कठीण आणि संवेदनशील भागात कार्यरत असताना २०११ ते २०१४ दरम्यान राज्यशास्त्र विषयातून पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर २०१४ ते २०१६ या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या दूर शिक्षण केंद्रामार्फत राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी (एम.ए.) प्राप्त केली.


या प्रवासात कुंभार यांनी दूर शिक्षण विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा.डॉ.सीमा येवले यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शना खाली पदवी पूर्ण केली हे सांगताना त्यांनी कर्मचाऱ्यांचा ही विशेष उल्लेख करत त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. सागर चौरे, बाबू चव्हाण आणि विकास पाटील यांचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले असून, "कोणतीही अडचण असो, या सर्वांनी सदैव तत्परतेने मदत केली," असे ते नमूद करतात.


त्यांची पत्नी अर्चना कुंभार यांचीही शैक्षणिक वाटचाल दूर शिक्षण केंद्राच्या माध्यमातूनच घडली आहे. त्यांनी बी.ए. (राज्यशास्त्र) पूर्ण केल्यानंतर सध्या एम.ए. (समाजशास्त्र) अंतिम सत्राची परीक्षा मार्च २०२५ मध्ये दिली आहे. कुंभार यांनी २०१९ साली सैन्य सेवेतून सेवानिवृत्ती घेतली असून, सध्या ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. "शिक्षणामुळे समाजासाठी काही तरी करण्याची दृष्टी आणि आत्मविश्वास मिळाला. दूर शिक्षण केंद्राने सैनिकांसाठी दिलेला हा प्लॅटफॉर्म म्हणजे एक अमूल्य दुवा आहे," असे त्यांनी सांगितले.


शिवाजी विद्यापीठाचे दूर शिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र हे केवळ शिक्षण प्रदान करणारे नव्हे, तर दुर्गम भागात असलेल्या, सेवेत कार्यरत असलेल्या व दुसऱ्या टप्प्यावरून शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठे आधारस्थान ठरत आहे, हे संतोष कुंभार यांच्या यशोगाथेतून अधोरेखित होते.


श्री. व सौ. कुंभार या उभयंतांनी यांनी दूर शिक्षण केंद्रातून पदवी व पदवीव्युतर शिक्षण पूर्ण करुन समाजापुढे एक आदर्शवत वस्तुपाठ निर्माण केला आहे. शिक्षण आणि संरक्षण या दृष्टीने कुंभार यांनी राष्ट्रीय बांधणी आणि उभारणी साठी केलेले कार्य निश्चितच आनंददायी व कौतुकास्पद आहे." डॉ. कृष्णा पाटील - संचालक दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र.

Post a Comment

Previous Post Next Post