नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी तीन महिन्यात निविदा




परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई :  भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या बोरिवली पूर्व येथील नँसी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे काल सायंकाळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व उपनगर पालक मंत्री अँड. आशिष शेलार यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. यावेळी मंत्री सरनाईक यांनी येथील नँसी आणि सुकरवाडी एसटी डेपोच्या पुढील ३ महिन्यांत निविदा काढणार, अशी घोषणा केली. 

यावेळी सरनाईक म्हणाले की, प्रवीण आणि प्रकाश दरेकर यांनी एका कंडक्टरचा मुलगा असल्याचा अभिमान वेळोवेळी सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवला.महायुतीच्या माध्यमातून राज्यात चांगली कामे सुरू आहेत. चार महिन्यात ज्या पद्धतीने आपण एसटीला पुढे नेलेय, सर्वसामान्य एक लाख एसटी कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. येत्या ३ जून रोजी एसटी कामगार संघटनेची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत एसटी कामगारांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याची ग्वाहीही सरनाईक यांनी दिली. 



 एसटी कामगार हा आमचा कणा आहे. विश्वासात घेतलेल्या एक लाख एसटी कामगारांना घेऊन राज्यातील ६५ लाख प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. येथील जे बस पोर्ट आहेत ते अतिशय अद्ययावत करू. भविष्यात या परिसरात विकासासाठी निधी हवा असेल तर निश्चितपणे हा प्रताप सरनाईक तुमच्या पाठी ठामपणे उभा राहील, असा विश्वासही सरनाईक यांनी उपस्थितांना दिला. 

तर सांस्कृतिक मंत्री अँड.आशिष शेलार म्हणाले की, हा निवारा कक्ष तुम्ही शेड म्हणून बांधला असेल पण कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या माणसाला तो प्रेम रूपाने दिला याचा जास्त आनंद आहे. एसटी कामगारांना प्रताप सरनाईक यांनी ३ जूनची आशा दाखवलीय. तुमच्या पोटडीत काय ते मला माहित नाही. पण गरिबांसाठी भांडणे हा सरनाईक यांच्या कार्याचा आत्मा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, पवार यांच्या सहकार्याने एसटी कामगारांचा पगार पूर्ण पण वेळेवर, कंडक्टरला सुविधा पण व त्यांच्या राहण्याची व्यवस्था पण आणि एसटी कामगारांना कायमस्वरूपी मदत मिळावी, यासाठी जर कोणी मदत करेल तर ३ जूनला प्रताप सरनाईक शंभर टक्के करणार, असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. 

यावेळी आशिष शेलार यांनी बेस्टच्या २ रुपये भाडेवाढीला विरोध करणाऱ्या उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, बेस्टचे भाडे १० रुपयावरून १२ रुपये झाले तर कोल्हेकुई करतेय कोण? परदेशात बसून आदित्य ठाकरे विरोध करताहेत. मात्र तिकडे गारेगार हवा खाताहेत. पण बेस्ट, एसटीच्या लोकांना मदत मिळावी म्हणून १० चे १२ रुपये झाले त्याला विरोध चालू केलाय. एसटी व बेस्ट जिवंत राहिली पाहिजे तर त्यात काही गोष्टी भरीव कराव्या लागतात, अशा परखड शब्दांत शेलार यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले. 



तत्पूर्वी आ. प्रविण दरेकर म्हणाले की, नँसी एसटी डेपो चांगल्या पद्धतीने विकसित कसा होईल याकरिता शासन स्तरावर निर्णय घ्या. या डेपोतून कोकणात १५० च्या वर बसेस जातात. पश्चिम महाराष्ट्रात ७०-८० फेऱ्या असतात. विशेषतः कोकण व प. महाराष्ट्रातील वर्ग मोठ्या प्रमाणावर या डेपोच्या माध्यमातून आपल्या गावी जात असतो. त्यामुळे मुंबई व बोरिवलीला साजेसे बस स्थानक करावे. भविष्यात विकासाचे जे मॉडेल करू त्यात कामगारांचे विश्रांती गृह, सुविधा, प्रवाशांच्या सुविधा यांना प्राधान्य देऊ. गाडीची दोन चाकं कामगार व प्रवासी आहेत. ते आहेत म्हणून ही परिवहन व्यवस्था आहे. आपल्या कारकिर्दीत परिवहन व्यवस्था आणखी सशक्त व्हावी,अशी अपेक्षाही दरेकरांनी मंत्री सरनाईक यांच्याकडे व्यक्त केली. 

 जेव्हा मी खाकी ड्रेस पाहतो तेव्हा बालपणीच्या आठवणी नजरेसमोर येतात. माझे वडील एसटी कंडक्टर होते. एसटी कंडक्टर, ड्रायव्हर आणि कामगार यांचे जीवन मी जवळून पाहिले आहे. आपण एसी बस कराल पण बस मधील कंडक्टर, ड्रायव्हर यांना मानसिक समाधान नसेल तर त्या एसी गाडीचे सुख त्याला लाभणार नाही. प्रताप सरनाईक यांनी या खात्याचा कारभार हाती घेतल्यापासून खाते सर्वाधिक गतिमान करत अमूलाग्र असे बदल करण्याची भूमिका घेऊन काम करणारे मंत्री ते आहेत. आज एसटी कामगारांचा पगार वेळेवर होत नाही. सरकार आपले आहे. त्यामुळे त्याच दिवशी वेळेत एसटी कामगारांचा पगार कसा होईल यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोला. एसटी कामगारांना वेळेत सुरक्षित पगार मिळण्यासाठी काळजी घ्या. आपल्या कारकिर्दीत पवित्र काम व्हावे, अशी अपेक्षाही दरेकरांनी व्यक्त केली.  

याप्रसंगी उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्याय, दहिसर विधानसभा क्षेत्राच्या आ. मनीषा चौधरी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, शिंदे सेनेचे युवा सेना सदस्य राज सुर्वे, शिंदे सेनेचे संजय घाडी, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, मागाठाणे मंडळ अध्यक्ष (उत्तर) अमित उतेकर, मागाठाणे मंडळ अध्यक्षा (मध्य) सोनाली नखुरे, निखिल व्यास, प्रीतम पंडागळे, महामंत्री ललित शुक्ला, कृष्णा दरेकर, विक्रम चोगले, एसटी महामंडळाचे अधिकारी यामिनी जोशी, विभाग नियंत्रक पळसकर यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. 




Post a Comment

Previous Post Next Post