ठाणे : गांधीनगर येथील लेप्रसी कॉलनीत नव्याने उभारण्यात येत असलेल्या विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या वातानुकूलित सभागृहाच्या बांधकामाची पाहणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनुसार आणि सामाजिक गरज ओळखून या सभागृहाचे काम सुरू करण्यात आले असून, सध्या हे बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याचे खासदारांनी सांगितले.
या एकमजली सुसज्ज सभागृहात विवाह, साखरपुडा, नामकरण, सत्कार समारंभ यांसारख्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा असणार आहेत. विशेषतः उष्ण हवामानाचा विचार करता, हे सभागृह वातानुकूलित असून स्थानिकांसाठी सुसंस्कृत व सन्मानजनक कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.
या उपक्रमासाठी स्थानिक प्रशासन, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याचे सांगत या परिसरातील नागरिकांची ही गरज दीर्घकाळ प्रलंबित होती. संसाधने मर्यादित असतानाही सातत्याने पाठपुरावा करत या कामाला गती मिळाल्याचा आनंद व्यक्त करत आज ते प्रत्यक्षात उतरतानाचा क्षण समाधान देणारा आहे,” असे यावेळी पाहणीदरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
या सभागृहाच्या उभारणीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या पाठबळामुळेच या कामास अधिकृत मान्यता व आवश्यक निधी मिळवून देणे शक्य झाले, असेही खासदारांनी नमूद केले.
सभागृहाच्या कामात आधुनिक स्थापत्यशास्त्राचा वापर करण्यात येत असून, प्रकाशयोजना, शौचालये, रंगमंच, स्वयंपाकघर, वॉर्डरोब आणि वाहतूक नियोजन यासारख्या सुविधांचीही विशेषतः काळजी घेण्यात आली आहे. परिसरातील लोकसंख्येची वाढ, सण-समारंभांची वारंवारता आणि धार्मिक भावनांची जपणूक हे सर्व घटक लक्षात घेता हे सभागृह परिसरासाठी फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सभागृहाचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार असून, त्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. सामाजिक सलोखा, सहकार्य आणि संस्कृतीच्या जपणुकीचा आदर्श ठरावे असे हे सभागृह स्थानिकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास खासदार म्हस्के यांनी व्यक्त केला.