पुणे : भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि आयुका (आंतरविद्याशाखीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र) संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले, ते ८७ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते आणि पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
डॉ. नारळीकर यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले आणि जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांच्यासमवेत काम करत ‘हॉयल-नारळीकर सिद्धांत’ मांडला. या सिद्धांताने ब्रह्मांडाच्या उत्पत्तीविषयी पारंपरिक बिग बॅंग संकल्पनेला पर्यायी वैज्ञानिक दृष्टिकोन दिला.
भारतात परत आल्यानंतर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) काम केले. १९८८ मध्ये पुण्यात आयुका या संशोधन संस्थेची स्थापना करून देशातील खगोलशास्त्राच्या अभ्यासाला नवे वळण दिले. डॉ. नारळीकर हे विज्ञान लेखनाच्या क्षेत्रातही तितकेच सक्रियर होते. ‘आकाशाशी जडले नाते’, ‘अंतराळातील भस्मासुर’, ‘यक्षांची देणगी’ अशा अनेक विज्ञानकथा, ललित लेख आणि वैज्ञानिक विषयांवरील पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांनी विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत सहजतेने पोहोचवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण, पद्मभूषण आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिले होते. त्यांच्या निधनाने विज्ञान, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते वैज्ञानिक जिज्ञासेचा दीप ठेवल्याचे कार्य त्यांच्या लेखनातून आणि संशोधनातून सदैव प्रेरणा देत राहील.
विज्ञान विषयक साहित्य निर्मिती करुन विज्ञान प्रसार करणारा एक महान शास्त्रज्ञ, मोठा लेखक आपण गमावला आहे. – मुख्यमंत्री
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक व विज्ञान प्रसारक पद्मविभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांच्या निधनाने विज्ञान विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने विज्ञान प्रसारासाठी वाहून घेतलेला वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे–उपमुख्यमंत्री अजित पवार