२४५२ विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत धक्कादायक चित्र
धरणगाव (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पिंपी गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये नुकतीच करण्यात आलेली आरोग्य तपासणी धक्कादायक निष्कर्ष घेऊन समोर आली आहे. एकूण २४५२ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ७१ विद्यार्थी प्री-डायबेटिक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. लहान वयातच मधुमेहाची शक्यता निर्माण होणे हे आरोग्य व्यवस्थेसाठी मोठा इशारा मानला जात आहे.
या विद्यार्थ्यांमध्ये सध्या मधुमेह नसला तरी त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी मध्यम व धोकादायक मर्यादेत असल्याने भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. या स्थितीला वैद्यकीय भाषेत 'प्री-डायबेटिक' असे संबोधले जाते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या अहवालावर प्रतिक्रिया देताना जंक फूडपासून मुलांना दूर ठेवण्याची गरज असून त्यासाठी त्यांच्याच जीवनशैलीत आहाराचे बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जनजागृती करावी लागणार आहे. तपासणीमध्ये अनेक मुले आणि पालक अनभिज्ञ होते की घरीच नियमित आहाराने मधुमेह टाळता येऊ शकतो. हे चित्र चिंताजनक आहे आणि त्यावर तत्काळ पावले उचलली गेली पाहिजेत, असे त्यांनी म्हटले.करनवाल यांनी पुढे स्पष्ट केले की, या मोहिमेमुळे मुलांमध्ये पोषण, व्यायाम व आरोग्यविषयक सवयी यांबाबत जागृती करण्यासाठी शाळा आणि पालक यांच्यात समन्वय साधून विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
विशेषतः निमशहरी व ग्रामीण भागांमध्ये बदललेल्या आहारशैली, कमी हालचाल, वाढलेला मोबाईल वापर, तणाव आणि पिझ्झा, बर्गर यांसारख्या अन्नपदार्थांचा अतिरेक यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे तज्ज्ञ सांगतात.
जिल्हा परिषदेच्या वतीने पुढील उपाययोजना
- प्रत्येक शाळेत मासिक आरोग्य तपासणी मोहीम
- पालकांसाठी आहार मार्गदर्शन सत्र
- शाळांमध्ये सकस आहाराचे प्रात्यक्षिक व कार्यशाळा
- योग व व्यायामाचे नियमित वर्ग