दीड कोटींहून अधिक अद्याप प्रलंबित
पुणे : केंद्र सरकारच्या ई-केवायसी मोहिमेअंतर्गत राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीत मोठा बदल होत असून, आतापर्यंत १८ लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत. यामागे बनावट कार्डे, एकाच व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा अधिक कार्डे असणे आणि मृत व्यक्तींची नावे अद्यापही सूचीमध्ये असणे ही मुख्य कारणे आहेत.
राज्यात एकूण ६.८५ कोटी रेशन कार्डधारक असून, त्यापैकी ५.२० कोटींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, अद्यापही सुमारे १.६५ कोटी कार्डधारकांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, ज्या नागरिकांचे ई-केवायसी बाकी आहे, त्यांनी ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.
मुंबई विभागात सर्वाधिक ४.८० लाख कार्डे रद्द झाली असून, त्याखालोखाल ठाणे विभागात १.३५ लाख कार्डे रद्द करण्यात आली आहेत.
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, जरी ई-केवायसीसाठीची अंतिम तारीख संपलेली असली, तरी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचे ई-केवायसी पूर्ण झालेले नाही, त्यांनाही धान्यवाटपाचे लाभ मिळत राहणार आहेत. नागरिकांनी भीती न बाळगता आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्णतः विनामूल्य असून, ती स्थानिक रेशन दुकाने किंवा संबंधित सरकारी कार्यालयांमध्ये पार पाडता येते.
हा संपूर्ण उपक्रम गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी राबवला जात आहे. त्यामुळे जे रेशन कार्डधारक अद्याप या प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करणे आवश्यक आहे.