रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार बाळ्या (सुरेश) म्हात्रे यांची मागणी
भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे खा. सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) यांनी भेट घेतली. या भेटीत मुरबाड नवीन रेल्वे मार्ग, कल्याण-असनगाव तिसरी लाईन, कल्याण-कसारा चौथी लाईन आणि कल्याण-बदलापूर तिसरी व चौथी लाईन या दीर्घकालीन प्रलंबित प्रकल्पांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय मंजुरी, निधी वाटप, तांत्रिक प्रक्रिया आणि कामांच्या कार्य वेळापत्रकावर विशेष भर देण्यात आला. या सर्व प्रकल्पांना गती देत कामे युद्धपातळीवर सुरू करण्याचे ठोस आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले. या भेटीत भिवंडी ते सीएसएमटी लोकल सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना वजा विनंती देखील करण्यात आली. या सेवेमुळे भिवंडी परिसरातील लाखो नागरिकांना दररोजच्या प्रवासात मोठा दिलासा मिळेल, तसेच मुंबईशी अधिक सुलभ व वेगवान जोडणी निर्माण होईल.या सर्व प्रकल्पांमुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघासह ठाणे, रायगड आणि पालघर या परिसरातील लाखो नागरिकांना रेल्वेच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. प्रवाशांसाठी अधिक जलद, सुरक्षित आणि दर्जेदार रेल्वे सेवा उपलब्ध होणार असून स्थानिक आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळणार असल्याचे खासदारांनी सांगितले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सुविधांसाठी आणि दीर्घकालीन विकासासाठी अशा महत्त्वपूर्ण प्रकल्पांना वेग देण्यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा पुढेही अविरत सुरू राहणार आहे. जनतेच्या विश्वासाला न्याय देणे हेच माझे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी म्हटले.