पनवेल-सोमटणे आणि पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाईन प्रकल्पास मंजुरी
४४४.६४ कोटींचा प्रकल्प मध्य रेल्वे करणार राबविणार
पनवेल : पनवेल परिसरातील रेल्वे कनेक्टिव्हिटीला नवे बळ देणाऱ्या दोन महत्त्वाच्या नवीन रेल्वे मार्गांना केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. पनवेल-सोमटणे आणि पनवेल-चिखली या दोन नवीन कॉर्ड लाईन प्रकल्पांसाठी एकूण ४४४.६४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हे दोन्ही प्रकल्प मध्य रेल्वेमार्फत राबविण्यात येणार आहेत.
या कॉर्ड लाईनमुळे पनवेलहून करजतकडे आणि पनवेलहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गांना पर्यायी आणि थेट जोडणी मिळणार असून, यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाशी रेल्वे मार्गाने अधिक सुलभ आणि वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आणि फायदे :
- पनवेल ते करजत मार्गावरील वाहतूक सध्या केवळ एका ट्रॅकवर चालते. नवीन कॉर्ड लाईन्समुळे ही वाहतूक दुप्पट होणार.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडणी मिळविण्यास मदत होणार.
- उपनगरीय प्रवाशांसाठी नव्या फेऱ्या चालविण्यास अधिक शक्यता.
- मालवाहतुकीचा वेग आणि कार्यक्षमतेत वाढ.
- पनवेल, करजत, पुणे आणि नवी मुंबई या केंद्रांना सुलभ रेल्वे संपर्क.
या प्रकल्पांतर्गत काही ठिकाणी बोगदे, पूल आणि सिग्नल प्रणाली यांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक जमिनीच्या अधिग्रहणासाठीही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद
या प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, डिसेंबर २०२५ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. निधीची तरतूद केंद्र सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली असून, प्रकल्पासाठी तांत्रिक आणि वित्तीय मंजुरी पूर्ण झाली आहे.
हा प्रकल्प केवळ पनवेलकरांसाठी नव्हे तर संपूर्ण कोंकण व मुंबई महानगर क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. या कॉर्ड लाईन्समुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल,असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक विकासाला चालना
या प्रकल्पांमुळे पनवेल, सोमटणे, चिखली, करजत व चाकण परिसरात औद्योगिक आणि निवासी विकासाला गती मिळण्याची शक्यता असून, स्थानिक रोजगार संधीही निर्माण होणार आहेत.