ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी

 


 २१ वर्षीय तरुणाचा कळवा रुग्णालयात मृत्यू

ठाणे :  ठाणे शहरात कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली असून, एका २१ वर्षीय तरुणाने उपचारादरम्यान प्राण गमावला आहे. हा तरुण मुंब्रा परिसरातील रहिवासी होता आणि त्याला मधुमेहासारख्या गंभीर व्याधींचा त्रास असल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

या तरुणाला मधुमेहाचा त्रास असल्यामुळे त्याला त्रास होऊ लागल्याने २२ मे रोजी ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीमध्ये गंभीर लक्षणं दिसून आल्याने त्वरित कोविड-१९ चाचणी घेण्यात आली. २३ मे रोजी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र उपचारादरम्यान, २४ मे रोजी सकाळी ६ वाजता त्याचा मृत्यू झाला.

सध्या ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरात १८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी एक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित १७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

या घटनेनंतर ठाण्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सजग झाली आहे. ठाणे महापालिकेने कळवा रुग्णालयात १९ खाटांचे स्वतंत्र कोविड वॉर्ड सज्ज ठेवले आहे. तसेच, RTPCR व रॅपिड चाचण्यांची सुविधा अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास तात्काळ चाचणी करून उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णात वाढ 
महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. २४ मे रोजी राज्यभरात ४७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ३० रुग्ण केवळ मुंबईतील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना पुन्हा एकदा खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

मास्क, स्वच्छता आणि अंतर आवश्यक
ठाणे महापालिकेने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, गर्दीपासून अंतर राखणे आणि लक्षणे दिसल्यास चाचणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोना अद्याप पूर्णतः गेलेला नाही, ही बाब लक्षात घेऊनच आपली जबाबदारी पेलावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post