मुंबई : पनवेल–कर्जत २९.६ किमी लांबीच्या उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) या प्रकल्पाची उभारणी करत आहेत. सध्या, सर्व तीन बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून, ट्रॅकचे काम सुरू युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील तीन लोकल ट्रेन रेक्स तयार असून हा मार्ग पूर्ण झाल्यावर प्रवाशांना अधिक जलद आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
या मार्गात पनवेल, महापे, चिकले, चौक आणि कर्जत या पाच स्थानकांचा समावेश असेल. या प्रकल्पात तीन बोगदे, दोन रेल्वे उड्डाणपूल, ४४ मोठे आणि लहान पूल, १५ रोड अंडरब्रिज आणि ७ रोड ओव्हरब्रिज यांचा समावेश आहे. वावर्ले बोगदा (२.६२५ किमी) हा मुंबई उपनगरीय रेल्वेवरील सर्वात लांब बोगदा आहे. या मार्गामुळे मुंबई आणि कर्जत दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होईल, ज्यामुळे चालू असलेल्या कल्याण मार्गावरील गर्दी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवीन मार्गामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुणे यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल, ज्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल.
या प्रकल्पामुळे पनवेल, कर्जत आणि आसपासच्या भागांतील शहरी विकासाला चालना मिळेल.