पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
अलिबाग \ धनंजय कवठेकर : अलिबाग समुद्रकिनारी शनिवारी सकाळी एका एटीव्ही बाईकने वृद्ध पर्यटकाला धडक दिली. ज्यात पर्यटक किरकोळ जखमी झाला. या घटनेमुळे अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या या गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी या निमित्ताने केली जात आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एटीव्ही बाईक चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. यापूर्वीही अलिबाग बीचवर असाच प्रकार घडला होता. तेव्हा एटीव्ही बाईकने उंटाला धडक दिल्याने उंट उधळला होता व उंटावर बसलेले पर्यटक पडून जखमी झाले होते. या वारंवारच्या अपघातांमुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शासनाची कुठलीही परवानगी नसताना या एटीव्ही बाईक समुद्रकिनाऱ्यावर बेदरकारपणे चालवल्या जातात. एखाद्या पर्यटकांना अपघात झाला तर त्याला दमदाटी केली जात असल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा समोर आले आहेत. त्यामुळे चालकांसाठी कडक नियमावली आणि प्रशिक्षणाची गरज असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. स्थानिक प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचेही या अपघातातून दिसून येते.
या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे. प्रशासन यावर आता काय पावले उचलेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पर्यटकांनीही समुद्रकिनारी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. चिंताजनक बाब म्हणजे या वाहनांची नियमित तपासणी केली जात नाही. त्यामुळे धोकादायक अवस्थेत या गाड्या व्यवसायासाठी आणल्या जातात. त्यामुळे अपघात होतात. १२ ते १४ वयोगटातील मुलेही या व्यवसायासाठी वापरले जातात. वेगमर्यादेचे उल्लघन केले जाते. गाडंयाचा आवाज मोठ्याने यावा यासाठी सायलेन्सर मध्ये बदल करून घेतले जातात. यामुळे कानठळ्या बसतील येवढे आवाज या गाड्या करतांना दिसतात. गाड्या कुठल्या क्षेत्रात चालव्या याचे निर्बंध अस्तित्वात नाहीत. त्यामुळे पर्यटकांच्या मधून कुठेही या गाड्या चालविल्या जात आहेत.
एटिव्ही बाबात शासन स्तरावर धोरणच अस्तित्वात नसल्याने अनिर्बंधपणे हे व्यवसाय सुरु आहेत. एटिव्ही अर्थात ऑल टरेन बाईक या गाड्या खेळण्यांच्या प्रकारात मोडतात, त्यामुळे या गाड्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रजिस्ट्रेशन लागत नाही. गाड्यांची तपासणी केली जात नाही. कुठल्याही विभागाची व्यवसायासाठी परवानगी घेण्याची गरज पडत नाही. व्यवसायासाठी नियम आणि अटि अस्तित्वात नाही, त्यामुळे अनिर्बंध परिस्थितीत हा व्यवसाय किनारपट्टीवर गेल्या दोन वर्षांपासून फोफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या व्यवसायाबाबत शासनाने ठोस धोरण ठरवणे आवश्यक आहे.