महायुतीच्या भ्रष्ट कारभारावर कॉंग्रेसची टीका
मुंबई: राज्यात अवघ्या एका पावसाने मुंबईची पुन्हा एकदा तुंबई केली आहे. रस्त्यांवर, उपनगरांमध्ये आणि रेल्वेमार्गांवर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे सामान्य मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पहिल्या पावसानेच’ प्रशासनाची तयारी फोल ठरल्याचे चित्र पहायला मिळाले.
मुंबईतील अंधेरी, सायन, दादर, कुर्ला, मुलुंड, चेंबूर, भांडूपसारख्या भागांमध्ये रस्त्यांवर तळ्यासारखे पाणी साचले आहे. रेल्वे ट्रॅकही जलमय झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना तासन्तास वाहतूककोंडीत अडकून राहावे लागले.
या पावसाने महायुती सरकार आणि बीएमसीच्या गैरकारभाराचा आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्याची जोरदार चर्चा जनतेमध्ये सुरू आहे. भाजप-शिंदे सेना-अजित पवार यांची महायुती सत्तेत असतानाही मुंबईतील ड्रेनेज, गटार सफाई, पावसाळ्यापूर्व तयारी या सर्वच बाबतीत ढिसाळ नियोजन असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करून केली आहे.
विरोधी पक्षांकडूनही या परिस्थितीवर सडकून टीका करण्यात येत आहे. "भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत मुंबई बुडाली आहे. यांचे कर्तृत्व इतके ‘भव्य’ आहे की पुढच्या निवडणुकीत मत मागायला हे बोटीतूनच फिरतील," अशी टीका सपकाळ यांनी केली.
मुंबई महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना, पहिल्याच पावसाने उघड करून दाखवले आहे की, सत्ताधाऱ्यांनी केवळ घोषणाबाजी केली, पण जमिनीवर कोणतीही परिणामकारक कृती झाली नाही.
मुंबईकर मात्र या वर्षी आणखी एक पावसाळा सहन करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. "दरवर्षी असेच होते, पण यंदा अगदी पहिल्याच पावसात घराबाहेर पडणे कठीण झाले. यावर लोक आता कठोर उत्तर देतील," असा सूर नागरिकांमध्ये आहे.
