मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र - SSC) परीक्षेचा निकाल दिनांक १३ मे २०२५ रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला होता. या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या अधिकृत गुणपत्रिका शाळांमार्फत वितरित करण्याची प्रक्रिया सुरु होत आहे.
शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखालील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांची गुणपत्रकं आणि तपशिलवार गुणांची शालेय अभिलेखं सोमवारी, २६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वितरित केली जाणार आहेत.
त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित शाळेमार्फत गुणपत्रके दिली जाणार आहेत. सर्व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची आणि योग्य वितरण प्रक्रियेची पूर्ण तयारी ठेवावी, असे निर्देश मंडळाकडून देण्यात आले आहेत.
शाळांनी विद्यार्थ्यांच्या यादीनुसार गुणपत्रकांचे वितरण करावे आणि योग्य त्या शासकीय नोंदी पूर्ण कराव्यात. गुणपत्रक वितरणावेळी पालकांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून काही शंका अथवा त्रुटी असल्यास तत्काळ निदान करता येईल.
तसेच, कोणत्याही प्रकारच्या गुणांच्या त्रुटी अथवा हरवलेल्या गुणपत्रकांच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. यासाठी मंडळांकडून स्वतंत्र मार्गदर्शक सूचना शाळांना पुरविण्यात आलेल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या प्रक्रियेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि आपले मूळ ओळखपत्र तसेच शाळेचा ओळख क्रमांक सोबत ठेवावा, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.