५० बस, २३ मार्ग, ३१६ थांबे
जळगाव: जळगाव शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत ऐतिहासिक पाऊल टाकत जळगाव महापालिकेने ई-बस सेवा सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आणला आहे. गेल्या दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या सेवेला आता प्रत्यक्ष आकार मिळत असून, १५ ऑगस्ट २०२५ रोजी ई-बस रस्त्यावर धावण्यास सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेकडून या प्रकल्पासाठी सध्या जोरात तयारी सुरू आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत आमदार सुरेश भोळे आणि खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत बसेसचे मार्ग निश्चित करण्यात आले. या बैठकीत महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी १५ ऑगस्ट हा शुभारंभाचा मुहूर्त असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.
या योजनेत २३ मार्ग निश्चित करण्यात आले असून, सुमारे २३१ किलोमीटर अंतरावर ५० ई-बस धावणार आहेत. शहरासह परिसरातील ग्रामीण भागांनाही या सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे. एकूण ३१६ बस थांब्यांची आखणी येत्या आठवडाभरात पूर्ण होणार असून, पुढील पंधरवड्यात प्रवास भाडेही टप्प्याटप्प्याने निश्चित केले जाणार आहे.
बसेसची रचना आणि यंत्रणा
ई-बस सेवा पुरवण्यासाठी जेबीएफ इकोलाइफ या कंपनीची निवड करण्यात आली आहे. हीच कंपनी बसचे संचलनही करणार आहे. बससाठी आवश्यक असलेला डेपो आणि चार्जिंग स्टेशन शिवाजी उद्यानालगतच्या जागेत उभारण्यात येत आहे. या ठिकाणी ४० टक्के काम पूर्ण झाले असून, ३० जुलैपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या सहकार्याने ५० ई-बस उपलब्ध केल्या जातील. यामध्ये १२ मीटर लांबीच्या २४ बसेस, ९ मीटरच्या ६ बसेस आणि ७ मीटर लांबीच्या २० बसेस यांचा समावेश आहे.
महापालिकेने खालीलप्रमाणे २३ मार्ग आणि त्यांच्या थांब्यांची प्राथमिक यादी निश्चित केली आहे:
१. जुने बसस्थानक – विद्यापीठ : १७ थांबे
२. जुने बसस्थानक – पाळधी : १८ थांबे
३. जुने बसस्थानक – जळगाव खुर्द : १४ थांबे
४. जुने बसस्थानक – म्हसावद : १८ थांबे
५. जुने बसस्थानक – उमाळा फाटा : १५ थांबे
६. जुने बसस्थानक – कानळदा : १२ थांबे
७. जुने बसस्थानक – विदगाव : १५ थांब
८. जुने बसस्थानक – शेळगाव : १२ थांबे
९. जुने बसस्थानक – हरीविठ्ठल नगर : १३ थांबे
१०. जुने बसस्थानक – मोहाडी : १५ थांबे
११. जुने बसस्थानक – पिंप्राळा हुडको : २१ थांबे
१२. जुने बसस्थानक – कोल्हे हिल्स : १३ थांबे
१३. एकनाथनगर – मेहरूण पाटचारी : १२ थांबे
१४. जुने बसस्थानक – निमखेडी : १७ थांबे
१५. जुने बसस्थानक – गणेश कॉलनी : ७ थांबे
१६. शिरसोली नाका – जुने बसस्थानक : ६ थांबे
१७. जुने बसस्थानक – शिरसोली : १५ थांबे
१८. जुने बसस्थानक – धानवड : १६ थांबे
१९. एकनाथनगर – जुने बसस्थानक : ११ थांबे
२०. एकनाथनगर – चिंचोली गाव : १० थांबे
२१. एमआयडीसी – अजिंठा चौफुली : १८ थांबे
२२. जुने बसस्थानक – सावखेडा : २० थांबे
२३. जुने बसस्थानक – खंडेराव नगर : २१ थांबे
जळगाव महापालिकेच्या ई-बस प्रकल्पामुळे शहरात स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीची सुविधा मिळणार आहे. १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या सेवेमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल, तसेच प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासही मदत होणार आहे.