अंबरनाथ तालुक्यातील भाल येथे १७ लाखांचे एमडी जप्त


 अंबरनाथ/ अशोक नाईक : अंबरनाथ तालुक्यातील मलंगड परिसरातील  भाल येथून ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडक कारवाई‌१७ लाखांचा मेफेड्रोन जप्त केले आहे याप्रकरणी पोलिसांनी जय रेवगडे (२१) व साहिल कांगणे (२४) या दोघांना अटक केली आहे. दरम्यान उल्हासनगर आणि अंबरनाथ मध्ये देखील ठाणे गुन्हे शाखेकडून अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई होत असताना स्थानिक पोलीस याबाबत अनभिज्ञ कसे काय? असा प्रश्न स्थानिक पोलिसांच्या यंत्रणेबाबत उपस्थित केला जात आहे. 


उल्हासनगर परिमंडळ-४ अंतर्गत गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थ सेवन आणि विक्री विरधात धाडसत्र सुरू आहे. नुकतीच उल्हासनगर गुन्हे शाखाने अंबरनाथ मधील भगतसिंगनगर परिसरातून दीड किलो गांजा जप्त करून कारवाई केली होती. अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट शहरातच नव्हे तर ग्रामीण परिसरात पसरत असल्याचे भाल गावातील कारवाईवरून समोर येत आहे. 


मलंगगड परिसरातील भाल येथील गुरुकुल हायस्कूल जवळील सिताराम म्हात्रे नगर भागात ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी रात्री धडक कारवाई केली या कारवाईत जय रेवगडे यांच्याकडून ६३.६ ग्रॅम वजनाचे आणि १२ लाख ७२ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन तर साहिल कांगणे याच्याकडून २१.५ पाच ग्रॅम वजनाचे आणि ४ लाख ३० हजार रुपये किमतीचा असा एकूण १७ लाखांचा मेफेड्रोन साठा जप्त केला आहे.सदर दोन्ही आरोपी कल्याण खडकपाडा येथे राहणारे आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post