दिवा \ आरती परब : दिव्यामध्ये सध्या रस्त्यावरून चालायचे कसे ?हा भीषण प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. दिवा स्टेशनपासून दिवा आगासन रोड, साबेगाव, मुंब्रा देवी कॉलनी रोड परिसर हा अनधिकृतरित्या अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडला आहे. रस्ता व्यापणाऱ्या फेरीवाल्यांच्या दादागिरीने दिवेकर कंटाळला आहे. या असंख्य फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे अपघात, वाहतूक मकोंडी, धक्काबुक्कीचे प्रकार, गलिच्छ शिवीगाळ, दिवेकरांना रोजचे झाले आहे. दिवेकरांना रस्ताने चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. त्यासाठी आज दिव्यातील भाजपच्या शिष्ट मंडळाने ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्याशी भेट घेऊन फेरीवाल्यांवरील प्रश्नावर लक्ष घालण्यासाठी निवेदन दिले आहे.
फेरीवाले जे रस्ता अडवतात त्यांची अनेक वेळा दिवा प्रभाग समितीमध्ये तक्रार केली असता तात्पुरती कारवाई होते. हफ्ते वसुलीवाले सुद्धा कारवाईबाबत फेरीवाल्यांना सतर्क करतात आणि कारवाई करणारे निघून गेल्यावर पुन्हा जैसे थे फेरीवाले बसायला सुरुवात करतात. या फेरीवाल्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा चिटणीस विजय अनंत भोईर, दिवा शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, रोशन भगत, समीर चव्हाण यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्याशी भेट घेतली आणि दिव्यामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांना हटवून कडक कारवाई करण्याबाबत चर्चा केली. तसेच या फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांवर सुद्धा कारवाई करावी ही विनंती यावेळी या सर्व शिष्टमंडळाने आयुक्तांना केली आहे.
