स्थलांतरित पूरबाधितांना आवश्यक सोयीसुविधा द्या
कोल्हापूर / शेखर घोंगडे : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाची उघडीप असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे कोयना, वारणा, राधानगरी व दूधगंगा धरणांतून होणारा विसर्ग कमी होत असून दोन दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल, असा अंदाज आहे. अलमट्टीच्या विसर्गाबाबत समन्वय कायम ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
पंचगंगा नदीची पाणीपातळी राजाराम बंधाऱ्याजवळ हळूहळू स्थिर होत आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पुराच्या पाण्यात वाहन चालवून जीव धोक्यात घालू नका, तसेच स्थलांतरित पूरबाधित नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
गुरुवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, नृसिंहवाडी आणि हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी भागाची पाहणी करून ग्रामस्थ व पूरबाधितांशी संवाद साधला. यावेळी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, शिरोळचे तहसिलदार अनिलकुमार हेळकर, अपर तहसिलदार महेश खिलारी, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, मुख्याधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
नृसिंहवाडी दत्त मंदिर परिसरातील वाढलेली पाणीपातळी आणि कुरुंदवाडमधील श्री दत्त महाविद्यालयात सुरू असलेल्या निवारा केंद्राला त्यांनी भेट देऊन पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. या नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कुरुंदवाड येथील गोठणपूर भागाची पाहणी करून पूरबाधितांच्या अडचणी जाणून घेतल्या.
घाबरू नका, जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे. परिस्थितीनुसार प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि अनावश्यक गर्दी टाळा. पुराच्या पाण्यात वाहन चालवू नका, जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी नागरिकांना केले.
यावेळी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे व तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी पूरस्थितीची माहिती दिली.