ठाणे जिल्ह्यात ४,४९० नागरिकांची कर्करोग तपासणी


कर्करोग जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

 २३७ संशयित रुग्ण आढळले

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या उपक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या कर्करोग मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून आतापर्यंत ४,४९० नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये २३७ संशयित रुग्णांचे निदान झाले आहे.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्हॅनचे संचालन सुरु आहे. आरोग्य यंत्रणेच्या विविध घटकांशी समन्वय साधून जिल्ह्यातील विविध ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये ही सेवा पोहोचवली जात आहे.


जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मोबाइल व्हॅन मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यासारख्या प्रमुख प्रकारांवर लक्ष केंद्रित करते. अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेली ही व्हॅन स्थानिक आरोग्य केंद्रांपासून दूर असलेल्या भागांतील नागरिकांसाठी एक वरदान ठरत आहे.

फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या तपासणीतून आढळून आलेल्या २३७ संशयित रुग्णांना पुढील तपासणी व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठवण्यात आले आहे. लवकर निदान झाल्यास कर्करोगाचे परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतात, हे लक्षात घेता या मोहिमेचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.



कर्करोग हा असंसर्गजन्य आजार असून त्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. जीवनशैलीतील बदल, तंबाखूचे सेवन, असंतुलित आहार यांसारख्या घटकांमुळे ग्रामीण भागातही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, कर्करोग हे कालांतराने विकसित होणारे आजार असल्यामुळे तपासणीद्वारे त्याचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात. म्हणूनच ही मोहीम केवळ तपासणीपुरती मर्यादित नसून, जनजागृतीही तिचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून, अधिक गावांमध्ये आणि दुर्गम भागांमध्ये व्हॅनची सेवा पोहोचवण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासोबतच, स्थानिक स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि आशा वर्कर्स यांच्या समन्वयाने या मोहिमेला अधिक व्यापक आणि परिणामकारक बनवले जाणार आहे.





Post a Comment

Previous Post Next Post