योगिता नाईक यांचा ठाम विश्वास
दिवा \ आरती परब : ठाणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक २८ मधील सर्व जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असा ठाम विश्वास कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका योगिता हेमंत नाईक यांनी व्यक्त केला.
दिवा शहर हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा कायमचा बालेकिल्ला असल्याचे त्या म्हणाल्या. मागील निवडणुकीत उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाने दिलेले आठ उमेदवार दिवेकरांनी प्रचंड मताधिक्याने विजयी करून पाठवले होते. मात्र, कालांतराने त्यांपैकी सात नगरसेवकांनी गद्दारी करत पक्षाशी विश्वासघात केला.
“या गद्दारीनंतर दिवा शहरातील शिवसैनिकांनी हार न मानता नव्या जोमाने पक्ष पुन्हा उभा केला. नागरिकांच्या विविध अडचणी सोडवण्यात आम्ही सातत्य ठेवले, त्यामुळे आज पुन्हा शिवसेनेला दिव्यात प्रचंड जनाधार मिळाला आहे,” असे योगिता नाईक यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, “दिवा शहरातील नागरिक प्रभाग क्रमांक २७ आणि २८ मधील आमच्या सर्व आठही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील. या नगरसेवकांच्या माध्यमातून दिवेकरांच्या समस्या ठाणे महानगरपालिकेमध्ये प्राधान्याने सोडवल्या जातील.” दिवा शहरात पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लाट दिसत असल्याचे या निवेदनातून स्पष्ट होते.
